सक्तीमुळेच ‘आधार’ची आठवण
By admin | Published: April 25, 2015 05:12 AM2015-04-25T05:12:14+5:302015-04-25T05:12:14+5:30
सध्या शहराच्या विविध भागांतील १७ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ८०.४३ टक्के नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध शासकीय कामकाजासाठी
मंगेश पांडे, पिंपरी
सध्या शहराच्या विविध भागांतील १७ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ८०.४३ टक्के नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध शासकीय कामकाजासाठी पुन्हा ‘आधार कार्ड’ची सक्ती केली जाऊ लागल्याने २ महिन्यांपासून ओस पडलेल्या केंद्रांवर गर्दी दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आधार नोंदणीचा पहिला टप्पा २० जानेवारी २०११ ते १६ फेबु्रवारी २०१२ दरम्यान राबविण्यात आला. यामध्ये ५ लाख ५ हजार ४७ जणांची नोंदणी करण्यात आली, तर १९ जून २०१२ पासून नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू केला. या अंतर्गत अद्यापपर्यंत १३ लाख ८९ हजार ६८४ जणांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी आधार नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याने या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या संबंधित कंपनीने शहरातील काही ठिकाणचे आधार नोंदणी केंद्र बंद केले. शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे सांगितले जाईल, त्याच वेळी नोंदणीला प्रतिसाद मिळतो. मात्र, इतर वेळी नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रात आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली. या केंद्रातही हवा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, पुन्हा विविध शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगितले जाऊ लागल्याने नागरिक आधार नोंदणी केंद्रात येऊ लागले आहेत. मतदारनोंदणी, घरगुती गॅसजोड, शिधापत्रिका, विविध दाखले यासाठी आधारची गरज भासत आहे.