घोडेगाव तहसीलमध्ये ग्राहक दिन कार्यक्रम रद्द, तहसीलदारांची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:51 AM2018-12-27T00:51:48+5:302018-12-27T00:51:55+5:30
घोडेगाव येथील तहसील कार्यालयात आज (दि. २६) अचानक आयोजिलेला राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम जनतेला समजलेला नाही व त्यातून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत.
घोडेगाव : घोडेगाव येथील तहसील कार्यालयात आज (दि. २६) अचानक आयोजिलेला राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम जनतेला समजलेला नाही व त्यातून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. असे करून तहसील कार्यालयाने राष्ट्रीय ग्राहक दिनाची हेटाळणी केली आहे, असा आरोप करीत आजचा हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांनी केली. कार्यकर्त्यांची नाराजी पाहून तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी माफी मागितली व दि. २९ रोजी हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याचे जाहीर केले.
२४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात हा ग्राहक दिन साजरा करण्याची जबाबदारी तहसील विभाग व ग्राहक पंचायतीच्या संघटनांची असते. यांनी एकत्र येऊन तारीख निश्चित करावी व तालुक्यातील जनतेला समजेल अशी जाहिरात करून ग्राहक दिनाला येण्याचे अवाहन करणे अपेक्षित असते. ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात जनतेचे प्रश्न शासकीय अधिकाऱ्यांनी सोडवायचे असतात.
या वेळी ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, सुभाष मावकर, अजित इंदोरे, देविदास काळे, दगडू लोखंडे, गणेश पाटील, वैभव वायाळ, अमोल वायाळ, अशोक भोर, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष हरीश कानसकर, आंबेगाव तालुकाध्यक्ष नवनाथ थोरात आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची नाराजी पाहून तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी माफी मागितली व शनिवारी (दि. २९) पूर्ण तयारी करून तहसील कार्यालयाच्या मोकळ्या आवारात पुन्हा हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. तसेच, दि. २७ रोजी अवसरी व दि. २८ रोजी वळती येथे ग्राहक पंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शासकीय यंत्रणा हजर राहील, असे त्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुका तहसील विभागाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पत्र दिले, फोन केले, मेसेज पाठविले; परंतु या कार्यक्रमाकडे तहसील विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कुठलेही पत्रक छापले नाही, कार्यक्रमाची तयारी केली नाही, कुणाला कळविले नाही, ऐन वेळी रात्री दहा वाजता मेसेज टाकून उद्या सकाळी कार्यक्रम असल्याचे कळविले जाते.
अचानक आयोजित केलेल्या कार्यक्रमाची तालुक्यातील जनतेला माहिती झाली नाही. आजच्या कार्यक्रमाची साधी कार्यक्रम पत्रिकासुद्धा तहसील कार्यालयाला दाखवता आली नाही. हे सर्व पाहता, राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाची तहसील कार्यालयाकडून हेटाळणी झाली आहे. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे नितीन मिंडे यांनी सांगितले.