सुक्या-ओल्या कच-यांचे विलगीकरण होईना!
By admin | Published: February 9, 2015 04:00 AM2015-02-09T04:00:57+5:302015-02-09T04:00:57+5:30
कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने घरोघरी डस्टबिन वाटप करण्यात आले. मात्र ओेला व सुका कचरा वेगळा करण्याची अंमलबजावणी नागरिकांकडून
पिंपरी : कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने घरोघरी डस्टबिन वाटप करण्यात आले. मात्र ओेला व सुका कचरा वेगळा करण्याची अंमलबजावणी नागरिकांकडून व महापालिकेकडून होताना दिसत नाही. महापालिकेचा कचरा विलगीकरणाचा महत्त्वाचा उद्देशच बाजूला राहिलेला दिसून येत आहे. नागरिक व घंटागाडी कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे ओला व सुका कचरा अजूनही एकत्र जमा होत आहे. शहरातील विविध मोठ्या सोसायट्यांचा कचरा अद्यापही एकत्रच गाड्यांमध्ये टाकला जात आहे. कचरा वेगळा करण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही. महापालिकेने कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटपावर लाखो रुपये अद्यापपर्यंत खर्च केलेले आहेत.
सोसायट्यामध्ये कचरा वर्गीकरणाविषयी कोणतीही अंमलबजावणी नाही. सोसायटी धारकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सोसायटी धारक कचरा टाकताना एकत्रितच कचरा टाकत आहेत. दोन डस्टबिनचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे कचरा वर्गीकरणासाठी पालिकेला घनकचरा नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात २ लाख ७७ हजार ९६६ कुटुंबांना डस्टबिन वाटप झालेले आहे. कर्मचाऱ्यांकडन ४ लाख ८६ हजार ९३२ डस्टबिन बकेट आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या आहेत. ९ लाख ५७ हजार ६९६ अशा हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या डस्टबिन मंजूर झालेल्या आहेत. या डस्टबिन ७ लीटर क्षमतेच्या आहेत. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुर्नर्निमाण योजनेच्या माध्यमातून डस्टबिन वाटप केले आहे. या अंतर्गत ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येणार आहे. याकरिता ६ कोटी ७९ लाख ६४६ हजारांचा निधी उपलब्ध झालेला आहे. याकरिता १ हजार ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र डस्टबिन वाटपाचे ४७ टक्के काम महापालिकेच्या वतीने पूर्ण झालेले आहे. डस्टबिन वाटपाचे अर्धे काम शिल्लक आहे. डस्टबिन वाटपात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कचरा विलगीकरणासाठी ३०२ टाटा एस ला रंग देऊन वाहतूक व्यवस्था केली आहे.(प्रतिनिधी)