चाकण शहरातील अतिक्रमणे हटवल्याने चौकांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:57+5:302021-01-09T04:08:57+5:30
चाकण शहरातील माणिक चौक, तळेगाव चौक, आंबेठाण चौकांमध्ये तसेच जुना पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले, हातगाडीवाले व्यवसायिकांनी रस्त्यावर ...
चाकण शहरातील माणिक चौक, तळेगाव चौक, आंबेठाण चौकांमध्ये तसेच जुना पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले, हातगाडीवाले व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती.यामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती.यामुळे चाकण नगरपरिषद,नाणेकरवाडी ग्रामपंचायत, चाकण पोलीस व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने हटवल्याने चौकांनी काही दिवस का होईना मोकळा श्वास घेतला आहे.
माणिक चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या जुन्या पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे.चक्रेश्वर मंदिर,चाकणचा भुईकोट किल्ल्याकडे जाणारे रस्ते आहेत. जिल्हा परिषद शाळा असून, या शाळेसमोरच अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी रस्त्यालगतच दुकाने उभी केल्याने रस्ते अरुंद झाल्याने वारंवार वाहतूककोंडी होऊन, लहान शाळकरी मुले, वृद्ध व आजारी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
महात्मा फुले चौकातील अनेक दुकानांसमोर खरेदीसाठी आलेल्यांची चारचाकी वाहने बिनदिक्कत रस्त्यावर उभी केली जात होती. या वाहनांमुळे एकसारखी वाहतूक कोंडी होत होती. दोन वाहने समोर आल्यावर चालकांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत होत्या. शिवाजी विद्या मंदिर चौकातही हीच परिस्थिती आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा भाजीवाले,फळ विक्रेत्यांमुळे वाहतूककोंडी होते.यामुळे नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत होता. नागरिकांच्या मागणीचा विचार करून रस्त्यालगतची अतिक्रमणे संयुक्त कारवाई करून हटवण्यात आली आहेत.
चाकण येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पोलीस अधिकारी.