बांडगुळ काढल्यामुळे दुर्मीळ वरूण वृक्षांना जीवदान; पुणे शहरात आता उरले फक्त 2 झाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 07:03 PM2020-12-07T19:03:25+5:302020-12-07T19:06:16+5:30

पुण्याइतकी वृक्ष विविधता दुसऱ्या कुठल्याही शहराला लाभलेली नाही.

Removal of rare varun trees due to removal of bandgul; There are only 2 trees left in Pune city now | बांडगुळ काढल्यामुळे दुर्मीळ वरूण वृक्षांना जीवदान; पुणे शहरात आता उरले फक्त 2 झाडे

बांडगुळ काढल्यामुळे दुर्मीळ वरूण वृक्षांना जीवदान; पुणे शहरात आता उरले फक्त 2 झाडे

googlenewsNext

पुणे :  पुण्यात ५३० वृक्षांच्या जातींची नोंद झाली आहे. अशी वृक्ष विविधता‌ कुठल्याही शहराला लाभलेली नाही. यापैकी २०० हून जास्त वृक्ष दुर्मिळ जातींचे आहेत. या जाती लावण्यामध्ये अनेक वृक्षप्रेमींचे प्रेरणादायी योगदान आहे.

कर्वेनगरमधील आमोद साने यांच्या मित्रमंडळाने अनेक वर्षांपूर्वी कर्वेनगरमधील रस्त्यांवर तब्बल २५० दुर्मिळ वृक्ष लावले होते. यापैकी २ 'वरुण' वृक्षांवर प्रचंड बांडगुळे वाढल्यामुळे ते मरणासन्न झाले होते. निसर्ग अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी टेलस संस्थेच्या लोकेश बापट यांच्या मदतीने ही बांडगुळ काढून वृक्षांना जीवदान दिले.  
 

दुर्दैवाने या वरुण वृक्षांचा नवसह्याद्री सोसायटीतला तिसरा भाउबंद मात्र २ वर्षांपूर्वीच नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बळी पडला. तिथल्या रस्त्यावरचा झाडलेला पालापाचोळा या सुंदर वरुण वृक्षाच्या तळाशी रचला जात असे आणि पेटवला जात असे. शोकांतिका अशी की वरुण म्हणजे पावसाचा देव, तोच या निष्काळजीपणे लावलेल्या आगीत जळून नष्ट झाला.

रस्त्यावरच्या दुर्मिळ झाडांना काही धोका निर्माण होत असेल तर तो दूर करून झाडे वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. सुजाण नागरिकांनी आपापल्या भागातल्या झाडांवर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. काही शहरांमध्ये अश्या काळजीवाहकाचे नाव आणि फोन नंबर दिलेले फलक लावतात. पुण्यातील वृक्षप्रेमी संस्थांनी ही संकल्पना लोकप्रिय करावी.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वा-यात अनेक झाडे उन्मळून पडतात, जीवितहानी होते, वाहनांचे नुकसान होते. अशा अपघाता नंतर 'कशी परदेशीच झाडे पडतात' याची चर्चा करण्याऐवजी  झाडाला आधार देणे, कुजलेल्या धोकादायक फांद्या वेळीच उतरवणे महत्वाचे आहे. खोड आतून किडले आहे का याची तपासणी केली तर अपघात टाळता येतात. हे वृक्षांपासून होणारे धोके‌ झाले.

वृक्षांना होणारे धोके पुढीलप्रमाणे आहेत. खोडाच्या तळाशी डांबर, काॅक्रीट किंवा ठोकळे गच्च बसवल्यामुळे मुळांना हवा, पाणी अन्न न मिळाल्याने झाड कमकुवत होते. झाडाचा अन्नपुरवठा सालीतून होतो त्यामुळे साल कापल्यास किंवा खोडावर तार दोरी बांधल्यास झाडाची वाढ खुंटते. झाड लावताना बसवलेले लोखंडी पिंजरे नंतर काढले जात नाहीत, ते खोडांमध्ये शिरून झाड विद्रूप आणि कमकुवत होते. झाडाखाली कचरा जाळणे अतिशय गैर आहे.

केवळ उद्यान विभागाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी झाडामुळे आणि झाडाला होणारे धोके नियमित देखभाल करून टाळले तर पुणे शहर जैवविविधते खेरीज वृक्षप्रेमासाठी कौतुकाने ओळखले जाईल.

Web Title: Removal of rare varun trees due to removal of bandgul; There are only 2 trees left in Pune city now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.