मस्तानी तलावातील गाळ काढल्याने पाण्याचा साठा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:18 PM2018-06-19T19:18:54+5:302018-06-19T19:18:54+5:30
राज्य शासनाच्या तलाव संवर्धन योजनेतून जवळपास ५ कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
फुरसुंगी : हवेली येथील ऐतिहासिक मस्तानी तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामामुळे यावर्षी पाऊस जर मोठ्या प्रमाणावर झाला तर येथील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. सध्या गाळ काढल्याने तलावाचा परिसर मोठा दिसत आहे. मस्तानी तलाव हा ऐतिहासिक तलाव असून तलावाच्या मोऱ्या बुजलेल्या आहेत. त्या मोकळ्या करून तलावाच्या भिंतींची डागडुजी करण्यात येणार आहे. डोंगरातून वाहून येणारे पाणी वडकी येथील नाल्यापर्यंत जाते. हे पाणी वनविभागाची मान्यता घेऊन आणि चऱ्या काढून तलावात सोडण्याचे नियोजन आहे.
हडपसर-महंमदवाडी पाणीयोजना अनेक वर्षापासून बंद आहे. उंड्री, पिसोळी व परिसरात साठणारे पाणी या योजनेद्वारे तलावात आणणे शक्य आहे. याबाबत काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. भविष्यात याठिकाणी बोटिंगची सुविधा देखील सुरु करता येईल. तलावापर्यंत जाण्यासाठी चांगल्या दर्जाचा रस्ता असावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
राज्य शासनाच्या तलाव संवर्धन योजनेतून जवळपास ५ कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या तलावाच्या खाली अनेक एकर शेती आहे. या तलावाच्या पाणी साठ्यामुळे विहिरींना विसर्ग राहतो. गाळ काढल्यामुळे वर्षभर पुरेल एवढा पाणी साथ राहिला तर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सुटेल.