पालखी मार्गावरील अतिक्रमणे, बेवारस गाडया हटवा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश

By राजू हिंगे | Published: June 7, 2024 08:29 PM2024-06-07T20:29:43+5:302024-06-07T20:30:29+5:30

मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करा

Remove encroachments derelict carriages on sant dnyaneshwar and sant tukaram maharj palkhi road Order of Pune Municipal Commissioner | पालखी मार्गावरील अतिक्रमणे, बेवारस गाडया हटवा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश

पालखी मार्गावरील अतिक्रमणे, बेवारस गाडया हटवा; पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत व स्वच्छता विषयक कामे करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचेही आदेश देण्यात आलेले आहे. 

श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात ३० जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची पाहणी केली. अतिरिक्त पृथ्वीराज बी.पी ,घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम , पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर अधीक्षक अभियंता दिनकर गोंजारे, उपायुक्त जयंत भोसेकर, अविनाश संकपाळ यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्षदेखील उभारण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेशित केलेले आहे. या कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणेकामी फिरते दवाखान्यांची आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सुचना केलेली आहे.वाहतूक पोलीसांमार्फत वाहतूक सुरळीत रहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घेणेस सांगितले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगतच्या सिमाभिंती रंगविण्यात येणार आहे.पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विसाव्याच्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करताना आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यास सांगितले आहे.पालखी सोहळ्यानिमित्त पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग व पालखी तसेच दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणे विचारात घेऊन पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असून, देखभाल दुरुस्तीकामी २४ तास दुरूस्ती यंत्रणा ठेवण्यात येणार आहे.पालखी मुक्कामाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात येत असून विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्या दिंड्या मनपाच्या शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असतात त्या ठिकाणी पाणीपुरवठा तसेच पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्या बाबत आदेशित केलेले आहे. आरोग्य विभागाकडून पालखी मार्गावर तसेच सर्व शाळांमध्ये औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत आहे.वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी या परिसराची २४ तास स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.पालखी पुणे मुक्कामी असताना विद्युत व्यवस्था खंडीत होणार नाही याबाबत संबंधितांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Remove encroachments derelict carriages on sant dnyaneshwar and sant tukaram maharj palkhi road Order of Pune Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.