भराव काढा, अन्यथा पूर आल्यास तुम्हीच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:27+5:302021-05-25T04:10:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खांब उभे करण्यासाठी नदीपात्रात ठिकठिकाणी केलेले भराव तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा पूर येऊन वस्त्यांमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खांब उभे करण्यासाठी नदीपात्रात ठिकठिकाणी केलेले भराव तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा पूर येऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महामेट्रो कंपनीला दिला आहे.
जलसंपदाचे अधीक्षक अभियंता स. द. चोपडे यांनी यासंबंधीचे पत्र महामेट्रोला दिले आहे. नदीपात्रात मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी नदीपात्रात तात्पुरता भराव टाकण्यात येतो. पावसाळ्यात धरणातून नदीचे पाणी सोडले जाते. भराव असेल तर पाण्याचा फुगवटा वाढून पाणी परिसरातील वसाहतींमध्ये शिरते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा भराव काढून टाकणे गरजेचे असते. डेक्कन तसेच संगम पुलाजवळचा भराव अद्याप काढला गेला नाही. त्याची दखल घेऊन जलसंपदाने हा इशारा दिला आहे.
महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, आम्ही गेली ३ वर्षे नेहमीच पावसाळ्यापूर्वी भराव काढून टाकत असतो. याही वेळी ते काम सुरू आहे. १५ जूनच्या आधी सर्व ठिकाणचे भराव काढणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे शिल्लक राहिलेले भरावही काढण्यात येतील. खांब तसेच मेट्रोचे अन्य काम करण्यासाठी म्हणून नदीपात्रात हे तात्पुरते भराव घालण्यात येतात. काम संपले की ते कायमस्वरूपी काढून टाकले जातात. जलसंपदाने निर्देश केलेले भरावही १५ जूनपूर्वी काढले जातील.