Khed Shivapur Toll Plaza: पुण्यातील खेड-शिवापूरचा टोल नाका हटवा; कात्रज चौकात घंटानाद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 06:21 PM2022-05-01T18:21:20+5:302022-05-01T18:21:47+5:30
पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरीलटोल वसुली बंद करावी
धनकवडी : खेड शिवापूर टोलनाका कृती समितीचा विजय असो... या टोल नाक्याचं करायचं काय.. खाली डोकं वर पाय..सामील व्हा सामील व्हा.. धरणे आंदोलनात सामील व्हा... यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी कात्रज चौक दणाणून गेला होता. पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी आणि टोल नाका हटवावा, या मागणीसाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने पुण्यातील कात्रज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी टोल प्रशासन आणि एनएचएआय विरोधात जोरदार घोषणाबाजी केली
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनकात्रज चौकात सर्व पक्षीय धरणे आंदोलन व सह्यांच्या मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनीधी विविध सामाजिक संस्था, संघटना कृती समितीसह सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहवयास मिळाला.
रखरखीत उन्हात तब्बल तीन तास भरणे आंदोलन सुरू होते, यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी जोशपूर्ण भाषणे, सह्यांची मोहीम आणि पाठिंबा असलेली पत्र देत घोषणांची आतिषबाजी पाहवयास मिळाली. दरम्यान सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाणारे असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली आहे. कृती समितीची एप्रिल महिनाअखेर एक बैठक झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र दिनी आंदोलन करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज हे आंदोलन करण्यात आले. सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. हा टोल नाका नागरिकांची लूटमार करत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
काय आहे वाद ?
२५ कि.मी. च्या टप्प्यासाठी ८० कि.मी.चा टोल वसुल करण्यात येत असून ज्या महामार्गाच्या कामाचे टेंडर २०१० रोजी झाले होते, त्याचे काम हे २०१२ पर्यंत पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती, तरीदेखील दहा वर्ष होऊनसुद्धा अद्याप काम पूर्ण होऊ शकलेले नाही. टोलनाक्यावर १ मार्च पासून पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड वाहन चालकांकडून टोल वसुली सुरू केली गेली आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून टोलनाक्यावर वादविवाद रोज होत आहेत. दरम्यान, भोर वेल्हा आणि हवेली येथील स्थानिकांना सूट देत आहोत, असे टोल प्रशासन आणि NHAIकडून सांगण्यात येत आहे. ही शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीची आणि लोक प्रतिनिधींची फसवणूक असल्याचे कृती समितीने म्हटले होते.
लोकप्रतिनिधींवरही टीका
पुणेकरांची बाजू कृती समितीने आंदोलनात वारंवार मांडली आहे . मात्र पुणेकरांचे लोक प्रतिनिधी प्रतिसाद देणार नसतील तर सामान्य जनतेसोबत ही लढाई लढावी लागेल. मात्र लोक प्रतिनिधींची टोलनाक्यांबाबतची अनास्था अनाकलनीय असल्याची टीका कृती समितीचे समन्वयक माऊली दारवटकर यांनी केली आहे. तर पुणे शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुण्याच्याच्या टोल मुक्तीसाठी संघटित व्हा, अन्यथा शिवापूर टोलनाक्याचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसेल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आमदारांच्या घरासमोर घंटानाद करण्याचा इशारा हि खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.