सार्वजनिक ठिकाणी लावलेले फ्लेक्स काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:32 AM2018-11-16T01:32:13+5:302018-11-16T01:32:37+5:30
धोकादायक विनापरवाना फ्लेक्सपासून रस्त्यांची मुक्तता
वानवडी : परिसरात कँटोन्मेंट व महापालिका हद्दीत सण, शुभेच्छा, व्यावसायिक व वैयक्तिक जाहिरातबाजी करण्यासाठी लावण्यात आलेल्या विनापरवाना फ्लेक्सवर महापालिका आकाशचिन्ह विभागाकडून कारवाई करण्यात आली.
वानवडीतील कँटोन्मेंट हद्दीतील फातिमानगर चौकात वळणावर रस्त्याच्या कडेला, झाडावर धोकादायकरीत्या विनापरवाना फ्लेक्स लावल्याने ते पडून अपघात होण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. लोकमत वृत्ताची दखल घेत पालिकेच्या वानवडी-रामटेकडी सहा. आयुक्त कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाकडून तातडीने वानवडी परिसरातील रस्त्यावर असणाऱ्या झाडांवरील, पथदिव्यांच्या खांबांवरील, विद्युत डीपीवरील तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले विनापरवाना धोकादायक स्थितीतील छोटे-मोठे फ्लेक्स काढण्यात आले.
आकाशचिन्ह विभागाकडून फ्लेक्सबाजीवर कारवाई
दंड वसूल
फ्लेक्सवरील कारवाईत वेगवेगळ्या ठिकाणाहून विनापरवाना असलेले १ होर्डिंग, ५१ बोर्ड, ४३ बॅनर, ३७ फ्लेक्स, २३ पोस्टर ,६ क्यू बॉक्स, ५७ झेंडे काढण्यात आल्याचे आकाशचिन्ह परवाना निरीक्षक मुरलीधर लोणकर यांनी सांगितले.
फ्लेक्स काढल्याने रस्त्यावरील पथदिवे, वृक्ष, विद्युत डीपी व रस्त्याच्या कडेला असणाºया सार्वजनिक जागांनी मोकळा श्वास घेतला असून परिसर छान दिसत आहे परंतु अशा फ्लेक्सला परवानगी नसली तरी फ्लेक्स लावून जाहिरात करणाºयांवर कठोर कारवाई करुन दंड वसूल केला पाहिजे.