वाहतूक बेटाचा अडथळा दूर
By admin | Published: July 25, 2015 04:16 AM2015-07-25T04:16:03+5:302015-07-25T04:16:03+5:30
पालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अनाधिकृतपणे कोथरूड कार्यालयाच्या हद्दीत चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आलेले आयलंड
कोथरूड : पालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अनाधिकृतपणे कोथरूड कार्यालयाच्या हद्दीत चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आलेले आयलंड (वाहतूक बेट) पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
महात्मा सोसायटीचे नागरिक हे वाहतूक बेट हटविण्यासाठी आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन ते हटविण्यास सुरुवात केली आहे. प्रभागरचनेच्या आराखड्यानुसार कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा निधी वापरण्यात आला आहे; परंतु सदरचे काम करताना कोणतीही पाहणी न करता काम केले असल्याने पीएमपीच्या गाड्या आणि खासगी वाहनांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत होता. पीएमपीनेही वाहतूक बेट हलविण्याची मागणी केली होती.
पालिकेच्या निधीचा कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त उमेश माळी यांनी गैरवापर केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेचे माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांनी केली आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. याबाबत माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वार्ताहर)