ओतूर येथील दशक्रिया घाटाचे नूतनीकरण
By admin | Published: April 26, 2017 02:55 AM2017-04-26T02:55:08+5:302017-04-26T02:55:08+5:30
श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील दक्षिणवाहिनी चंद्रभागेचे महत्त्व प्राप्त झालेल्या पवित्र मांडवी नदीकिनारी के. टी. बंधाऱ्यालगत
ओतूर : श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील दक्षिणवाहिनी चंद्रभागेचे महत्त्व प्राप्त झालेल्या पवित्र मांडवी नदीकिनारी के. टी. बंधाऱ्यालगत दशक्रिया घाटाची येथील ७ सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत दशक्रिया घाटाच्या दुरुस्तीची, तसेच नूतनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गेल्यावर्षी मांडवी नदीला आलेल्या पुरामुळे येथील दशक्रिया घाटाची दुरवस्था झाली होती. श्रीक्षेत्र ओतूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या घाटाच्या नूतनीकरणाचा ध्यास घेत वैकुंठधाम परिसर विकास समितीची स्थापना केली.
या समितीत चंद्रकांत लक्ष्मण डुंबरे, देविदास बाबूराव तांबे, सरपंच बाळासाहेब पांडुरंग घुले, शेखर वसंतराव डुंबरे, विठ्ठल शितोळे, रत्नाकर (दाजी) धिरडे, वसंतराव डुंबरे यांचा समावेश आहे. यातील चंद्रकांत डुंबरे व बंधू यांनी १ लाख, देविदास तांबे व बंधू बाळासाहेब घुले (सरपंच) विष्णू काळे व समस्त काळे परिवार, रा. ज्ञा. डुंबरे यांच्या वतीने प्रत्येकी ५१ हजार रुपये या परिसर विकासासाठी देणगी दिली. काही जणांनी देणग्या जाहीर केल्या आहेत. या निधीतून या परिसराच्या विकासकामाला सुरुवात झाली आहे. सध्या या ठिकाणी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऊन, वारा व पावसाळ्यात या ठिकाणी विधीसाठी आलेल्या नागरिकांची सोय होणार आहे. या शेडचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या समितीतील सदस्यांनी या स्थळाला चारही बाजूंनी ग्रील बसविले आहे, दशक्रिया विधीसाठीचा ओटा मार्बल टाकून मोठा केला आहे. या कामासाठी समिती सदस्यांनी मदत केली आहे. या समितीचे सदस्य चंद्रकांतशेठ डुंबरे व देविदास तांबे यांनी याच दशक्रिया स्थळाचा परिसर विकासाचा आराखडा
सर्व सदस्यांच्या विचाराने केला आहे. (वार्ताहर)