चाकण ते वासुली फाट्याच्या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:31 AM2018-08-30T00:31:11+5:302018-08-30T00:31:41+5:30
चाकण ते वासुली फाटा यादरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
आंबेठाण : चाकण ते वासुली फाटा यादरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु येत्या काही महिन्यांतच या रस्त्याचे राज्य शासनाच्या अॅन्युटी कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे बांधकाम विभागाचे संतोष पवार यांनी सांगितले.
चाकण ते वासुली फाट्यावरील १२ किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक लहान-मोठे कारखाने असल्याने वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. परिणामी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. वर्दळीच्या मानाने अरुंद आणि खराब रस्त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक वेळा नागरिकांनी रस्ता दुरुस्ती मागणी करून आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु आता हा रस्ता लवकरच होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. संतोष पवार म्हणाले की, अॅन्युटी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील वासुली फाटा ते चाकणचा आंबेठाण चौकपर्यंत, निघोजे-मोई-चिंबळी फाट्यापर्यंत हा रस्ता आणि मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे ते खेड तालुक्यातील करंजविहिरे ते आसखेड फाटा असे तीन रस्ते दुरुस्त केले जाणार आहे. वासुली फाटा ते चाकण हा रस्ता १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिटीकरण केला जाणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मोऱ्या टाकल्या जाणार आहेत. या रस्ता दुरुस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे संपादन केले जाणार नाही. चाकण नगर परिषद हद्दीत नगर परिषदेच्या मदतीने तर अन्य ठिकाणी स्वत: बांधकाम विभाग आवश्यक तेथे अतिक्रमण काढणार आहे.
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन यांना जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून चाकण वासुली फाटा रस्ता ओळखला जातो. परंतु सध्या या मार्गावर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे वाहनचालकांना समजणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुळातच रस्ता अरुंद असल्याने व पुन्हा रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याने अपघात घडण्याचे धोके वाढत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेने पायी चालणाºयांसह दुचाकीस्वार, महिला व दुचाकीचालकांना तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.