मत्स्यालयाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात

By admin | Published: January 20, 2016 01:28 AM2016-01-20T01:28:15+5:302016-01-20T01:28:15+5:30

शहरातील एकमेव सार्वजनिक मत्स्यालय असलेले संभाजी उद्यानातील मत्स्यालय लवकरच नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येत आहे.

Renovation of the aquarium in the last phase | मत्स्यालयाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात

मत्स्यालयाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात

Next

पुणे : शहरातील एकमेव सार्वजनिक मत्स्यालय असलेले संभाजी उद्यानातील मत्स्यालय लवकरच नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येत आहे. हँगिंग मत्स्यालय (पायी चालताना डोक्याच्या वर असलेले) हे नव्या रूपातील मत्स्यालयाचे आकर्षण असणार आहे.
सन १९५३ मध्ये या मत्स्यालयाची सुरुवात झाली. काचेच्या कपाटातील रंगबिरंगी जिवंत मासे हे तेव्हा पुणेकर बालगोपाळांसाठीच काय मोठ्यांसाठीही आकर्षणच होते. परगावाहून येणाऱ्यांसाठीही ‘पुण्यात काय पाहायचे’ यात संभाजी उद्यानातील या मत्स्यालयाचा समावेश असायचाच. तेव्हापासून ते आजतागायत पुण्यात असे दुसरे सार्वजनिक मत्स्यालय नाही. लाकडी कपाटात ठेवलेल्या काचेच्या पेट्या असलेल्या मत्स्यालयाचे पहिले नूतनीकरण सन १९९३ मध्ये झाले व ते दगडी बांधकामात बसलेल्या चारी बाजूंनी काचा असलेल्या पेटीत आले.
आता ते पुन्हा आधुनिक करण्याची गरज भासू लागल्याने उद्यान विभागाने तसा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी घेतली व काम सुरू केले. सध्या असलेल्या जागेच्या पुढेच ते वाढवण्यात आले आहे. पूर्वी १४ पेट्यांमध्ये २८ प्रकारचे मासे होते. आता नव्या मत्स्यालयात २८ पेक्षा जास्त पेट्या असतील व ५० पेक्षा जास्त प्रकारचे मासे. प्रवेशद्वारावरच तब्बल ४ पेट्या असतील. त्यातील दोन एकदम इमारतीच्या छताच्या उंचीपर्यंत इतक्या मोठ्या आहेत. दोन उभ्या आकाराच्या आहेत. मुंबईतील प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालयाप्रमाणेच आता या मत्स्यालयातही विविध प्रकारच्या माशांची माहिती असलेली पुस्तके, फलक असतील. मत्स्यालयातील सर्व प्रकारच्या आधुनिक उपकरणाचा समावेश असलेले असे हे मत्स्यालय असेल. त्यात खास माशांसाठी म्हणून एक दवाखानाही असेल व तिथे आजारी माशांवर उपचारही होतील.
गोड्या पाण्यातील शोभेच्या माशांबरोबरच आता समुद्रातच राहणाऱ्या, वाढणाऱ्या माशांचाही समावेश यात असणार आहे. त्यासाठी खास समुद्री पाणी तयार करणारे महागडे रसायन वापरण्यात येईल. त्याशिवाय दोन्ही बाजूच्या काचेच्या कपाटांच्या मधून चालताना वर डोक्यावर संपूर्ण काच असणार असून, त्यातही मोठे मासे असतील. हे हँगिंग अ‍ॅक्वेरियम नव्या मत्स्यालयाचे मोठेच आकर्षण असेल. उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले की आयुक्त कुणाल कुमार, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य यासाठी मिळाले.
फिशरी सायन्समध्ये पदवी मिळवलेले अभय कौलगुड सन १९९१ पासून मत्स्यालयाचे काम पाहतात. सध्या इथे पाकू पिऱ्हाना, टायगर शार्क, गोल्ड फिश, सिल्व्हर डॉलर, एंजन, रेड पॅरेट असे विविध प्रकारचे मासे आहेत. नव्याने जागा उपलब्ध झाल्यामुळे आता नव्या प्रकारचे, मोठे व आकर्षक रंग असलेले अनेक मासे आणता येतील, असे कौलगुड यांनी सांगितले. किरकोळ स्वरूपाची काही तांत्रिक कामे बाकी आहेत. ती पूर्ण झाली की नवे मत्स्यालय पुणेकरांसाठी सज्ज होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Renovation of the aquarium in the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.