प्रसिद्ध 'मॅनेजमेंट गुरू' डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:31 PM2021-01-08T19:31:33+5:302021-01-08T19:37:08+5:30
प्र. चिं. शेजवलकर यांनी वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांचा अगदी सहजपणे वावर होता.
पुणे : प्रसिद्ध मराठी लेखक, व्याख्याते, शिक्षण आणि व्यवस्थापनतज्ज्ञ अर्थात 'मॅनेजमेंट गुरू' म्हणून ओळख असणारे प्रभाकर चिंतामण शेजवलकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी,मुलगी जावई असा परिवार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आधी उपाध्यक्ष आणि २०१२ साली अध्यक्ष झाले होते. तसेच ते पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
प्र. चिं. शेजवलकर यांनी वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांचा अगदी सहजपणे वावर होता. तसेच विद्यापीठाच्या स्तरावर तब्बल सहा दशके त्यांनी शिक्षकीपेशा सार्थपणे निभावला. तसेच सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली. त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. ५० वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे. प्र.चिं. शेजवलकर यांना प्रसाद प्रकाशनातर्फे कै. मंजिरी जोशी स्मृती गौरव पुरस्कार प्रदान झाला.
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी शेजवलकर नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करत होते. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो, उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला.
आतापर्यंत त्यांच्या हाताखाली ८२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद त्यांनी खंडपणे भूषविले. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालकही होते.