गोव्यातून भाड्याने आणलेली आॅडी पुण्यात विकण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 08:59 PM2018-07-12T20:59:43+5:302018-07-12T21:01:43+5:30
गोवा येथून आॅडी कार भाड्याने आणत ती पुण्यात विकण्याचा प्लॅन करणाऱ्याला ४२ लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली.
पुणे : गोवा येथून आॅडी कार भाड्याने आणत ती पुण्यात विकण्याचा प्लॅन करणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला. आॅडी विकण्याचा प्रयत्न करणा-याला उत्तरप्रदेश येथील व्यक्तीला पथकाने २४ तासात जेरबंद केले आहे.
अशिष विजय डे (वय ३५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. डे याला अटक करून गोवा पोलिसांच्या ताब्यत देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्यू पुना क्लब रस्त्यावर संशयितपणे आॅडी गाडी फिरताना त्यांना दिसली. त्यावेळी ही गाडी अडविण्यात आली. चालक डे याच्याकडे गाडीच्या कागदपत्रे मागण्यात आली. त्यावेळी गोवा येथील बागा, कलंगुट येथून ही गाडी भाडे तत्त्वावर आणली आहे, असे सांगितले. मात्र त्याकडे अधिक तपास केला गाडी पुणे अथवा मुंबई येथे विकणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी गोवा येथील कलंगुट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
डे कडील ४२ लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब कोंढरे, प्रमोद मगर, रमेश गरूड आणि नारायण बनकर यांनी ही कारवाई केली.