फुटपाथ मिळताहेत भाड्याने?
By admin | Published: March 20, 2017 04:35 AM2017-03-20T04:35:16+5:302017-03-20T04:35:16+5:30
पुष्पमंगल चौक ते अप्परपर्यंत असलेल्या बिबवेवाडी-अप्पर रस्त्यावर भाजी, फळ, हातगाडीवाले यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण
बिबवेवाडी : पुष्पमंगल चौक ते अप्परपर्यंत असलेल्या बिबवेवाडी-अप्पर रस्त्यावर भाजी, फळ, हातगाडीवाले यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही व्यापाऱ्यांनी तर आपल्या दुकानासमोरील फुटपाथ भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे.
या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी फुटपाथदुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांचे लाखो रुपये वाया घातले जातात; मात्र ज्या नागरिकांच्या सोयीसाठी हे फुटपाथ तयार केले आहेत, त्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व या भागातील लोकप्रतिनिधींनीदेखील फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या बाजूला नगरसेवक प्रकाश कदम यांनी या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळावी व नागरिकांना योग्यदरात भाजीपाला मिळावा, यासाठी आठवडीबाजार सुरू केला आहे; मात्र तरीही रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते, भाजीविक्रेते, पाणीपुरीवाले यांनी ठिय्या
मांडलेला आहे.
दरम्यान, या अतिक्रमणांमुळे या भागात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. प्रभाग क्रमांक ३६ व ३७ यांमध्ये हा रस्ता येतो. या प्रभागातील लोकप्रतिनिधी याची गांभीर्याने दखल घेऊन आपली बिबवेवाडी स्मार्ट करण्यासाठी हा रस्ता नागरिकांसाठी खुला करतील, अशी अपेक्षा या भागातील जनता करीत आहे.
(वार्ताहर)