सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली मग साहित्याचा विसर का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:31+5:302021-01-03T04:13:31+5:30

नवीन वर्षात तरी मुहूर्त लागणार का? लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मराठी विश्वकोश निर्मिती ...

Reorganized the censor board then why forget the literature? | सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली मग साहित्याचा विसर का?

सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली मग साहित्याचा विसर का?

Next

नवीन वर्षात तरी मुहूर्त लागणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या दोन्ही मंडळांची पुनर्रचना लवकरात लवकर करण्याचे आश्वासन मराठी भाषा मंत्र्यांनी देऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही दोन्ही संस्थांच्या पुनर्रचनेला मुहूर्त लागलेला नाही. या पुनर्रचनेअभावी मंडळाचे विविध उपक्रम रखडले आहेत. शासनाने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्डाची) पुनर्रचना केली मग साहित्याबाबत दुजाभाव का, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.

विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा दिलीप करंबेळकर यांनी जानेवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यातच राजीनामा दिला. राजीनाम्याच्या स्वीकृतीसंदर्भात ३० जुलैला शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी देखील पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या दोन्ही मंडळांचे अध्यक्षपद रिक्त आहे. सदस्यांची नियुक्ती प्रक्रियाही रखडली आहे.

तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश मंडळांची तातडीने पुनर्रचना करून अध्यक्षपदी आणि मंडळाच्या सदस्यपदी खऱ्या अर्थाने साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, मान्यवर आणि कर्तृत्वसिद्ध लेखक, संस्कृतीतज्ज्ञ आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रातील निष्ठेने कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींची निवड जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांना करण्यात आली होती. त्यानंतर सुभाष देसाई यांनी ही पुनर्रचना लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. मात्र महाआघाडी सरकारला वर्ष झाले तरी दोन्ही मंडळांच्या पुनर्रचनेसंदर्भात काहीच कार्यवाही झालेली नाही.

चौकट

“महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांना मागणी करून तीन महिने झाले. त्याचा पाठपुरावाही करतो आहोत. दरम्यान, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना सरकारने केली. मात्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्र्वकोश मंडळ याबाबत अजूनही काहीच केले गेलेले नाही. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या हीरक महोत्सवी वर्षात हे दुर्लक्ष इष्ट नाही. सरकारने याबाबत तातडीने कृती करावी.”

- श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

--------------------------------------

Web Title: Reorganized the censor board then why forget the literature?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.