किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी गडप्रेमींनी पुढे यावे : श्रमिक गोजमगुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:02 IST2018-06-01T22:02:08+5:302018-06-01T22:02:08+5:30
किल्ल्यांच्या डागडुजी, दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्था व गडप्रेमींना पुढाकार घेण्याची गरज आहे.

किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी गडप्रेमींनी पुढे यावे : श्रमिक गोजमगुंडे
पुणे : महाराष्ट्रात ३५० किल्ले असले तरी पुरातत्व खात्यातर्फे फक्त ७८ किल्ले संरक्षित केले जात असून,उर्वरीत किल्ल्यांच्या डागडुजी व दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्था व गडप्रेमींना पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गडकिल्ल्यांचे अभ्यासक श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले. लालमहालात झालेल्या शिवधनुष्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
शिवधनुष्य प्रतिष्ठान व छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवनेरी ते रायगड असा सुमारे २६५ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. पायी पालखीचे बुधवारी शिवनेरीहून पुण्यात लालमहालात आगमन झाले. यानिमित्त शिवधनुष्य पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. रायगडाची गेली २८ वर्षे सेवा करणारे सुधीर थोरात, जुन्नर तालुक्यातील वृद्धांची सेवा करणारी संस्था राजाराम पाटील वृद्धाश्रम आधार केंद्र व संपूर्ण गावात वृक्षारोपण करून वेगळा संदेश देणारे उरळी कांचन जवळील अष्टापूर गाव , बियॉंंड कॉपोर्रेशन सर्व्हिसेस कंपनीचे संचालक पराग मते आणि शिवशाहीर हेमंत मावळे, कलावंत सचिन गवळी यांचा सन्मान करण्यात आला. कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकलवरून प्रवास करून वृक्षाचे व पाण्याचे महत्व सांगत प्रसार करणारी सायली महाराव या तरुणीचाही यावेळी खास सन्मान करण्यात आला . याप्रसंगी शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, भोई समाजाच्या महिला अध्यक्षा भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना सुधीर राऊत म्हणाले, रायगडाचा विकास आराखडा राज्य शासनाने तयार केला आहे . या विकास आराखड्याची अंमलबजावणी योग्य होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत.
------------------------------------------------------------