रस्त्याची दुरुस्ती करा; अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:09 AM2018-08-30T02:09:12+5:302018-08-30T02:09:30+5:30

महामार्ग प्राधिकरण : वारजे विकास कृती समितीचा एल्गार

Repair the road; Otherwise ... | रस्त्याची दुरुस्ती करा; अन्यथा...

रस्त्याची दुरुस्ती करा; अन्यथा...

Next

वारजे : बाह्यवळण महामार्गावर वारजे व आसपासच्या भागात महामार्गासह सेवा रस्त्याची अगदीच चाळण झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती न केल्यास रास्ता रोकोसह धरणे आंदोलन करण्याच्या इशारा येथील वारजे विकास कृती समिती व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात आला.

याबाबत सोमवारी प्राधिकरणाच्या वारजे येथील कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक (तांत्रिक) मिलिंद वाबळे, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, दीपाली धुमाळ सायली वांजळे, बाबा धुमाळ, रिलायन्सचे अधिकारी बी. के. सिंह, अभियंता राकेश कोळी, निवृत्ती येनपुरे व देवेंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या बैठकीत प्राधिकणाच्या वारजे परिसरतील चालू असलेल्या पुलाच्या कामासह सेवा रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. खड्डे एका दिवसात, तर पूल ७ तारखेपर्यंत खुला करण्याची मागणी सर्व रस्त्यांना पडलेल्या अनंत खड्ड्यांनी वाहनचालक हैराण झालेले असून या भागात गाड्यांचे टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खड्डे प्रथम भरण्याची प्रमुख मागणी होती. तसेच, माई मंगेशकर रुग्णालय (पॉप्युलर नगर)समोरील उड्डाणपूलाचे एक मार्गिका (लेन) तातडीने खुली करण्याचा अल्टिमेटमदेखील प्रशासनाला देण्यात आला. त्यावर सिंह यांनी सततच्या पावसाने कामात अडचणी येत असल्या तरी खड्डे हे आज व उद्या अशा दोनच दिवसांत भरण्यात येतील. त्यासाठी खास रेडी मिक्स मटेरियल व अधिक मनुष्यबळ वापरण्याची हमी दिली. परंतु, पुलाची एक मार्गिका सुरू करण्याचे मात्र त्यांनी आश्वासन दिले नाही. पुलाचे एका बाजूचे कठडे अपूर्ण अवस्थेत असून कडेला तात्पुरते ड्रम लावून दिवसादेखील वाहतूक सुरू करणे अत्यंत धोक्याचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हे कठड्याचे काम होऊन पूल सुरू करण्यास अजून एक महिन्याचा कालखंड लागेल, असे ते म्हणाले. सात तारखेपर्यंत सेवा रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरणाचे काम मात्र करून देण्यास त्यांनी तयारी दाखवली. भरलेल्या खड्ड्यांबाबत दररोज संध्याकाळी कृती समिती सदस्य बाबा धुमाळ यांना माहिती देण्याचे व समन्वय साधण्याचेदेखील या बैठकीत ठरले.


महामार्गावर २५ गाड्यांचे दोन्ही टायर पंक्चर
४रविवारी रात्री रक्षाबंधन सण साजरा करून घरी परत असलेल्या सुमारे २५ मोटारी वारजे येथील आरएमडी शाळेसमोर सातारा लेनमध्ये मोठ्या खड्ड्यात आपटून पंक्चर झाल्याचे पाहायला मिळाले. यात लहान मुले स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांचे पाऊस व अंधारात प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले.
४रात्री साडेआठ ते साडेअकरादरम्यान हा प्रकार घडला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तसेच रात्री उशीर झाल्याने परिसरतील सर्वच पंक्चर दुकाने बंद झाली होती. त्यामुळे दोन टायर पंचर झाल्याने एक अधिक स्टेपनी असूनही वाहनचालकांना मदत मिळेपर्यंत ताटकळत थांबावे लागले.


आम्ही येथील महामार्ग परिसरातील महालक्ष्मीनगर येथे राहतो. सकाळपासून येथील खड्ड्यात आपटून सुमारे १० मोटारीचे टायर फुटून (बर्स्ट झाल्याचा) मोठा आवाज आल्याचे आम्ही ऐकले. रात्री उशिरा ते मोठे दोन खड्डे भरण्यात आले.
- यश सावजी,
स्थानिक नागरिक


सदर अपघातग्रस्त मोटारींच्या ठिकाणी मी स्वत: रात्री गेलो होतो. तसेच, रात्री उशिरादेखील वाहनचालकांच्या सोयीसाठी एक कर्मचारी व विभागाचे वाहन दिले होते. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व संबंधित अभियंत्यांना याची तत्काळ दाखल घेत दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनचालकांनी तक्रार दिल्यास प्राधिकरणाच्या अधिकारी व संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करू.
- अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक (वाहतूक) वारजे विभाग

Web Title: Repair the road; Otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.