वाडा ते घोडेगाव रस्ता दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:09+5:302021-07-17T04:10:09+5:30
खेड तालुक्यातील वाडा, डेहणे परिसरातील गावांना राजगुरूनगर पेक्षा घोडेगाव जवळ पडते. वाड्यावरून घोडेगाव अवघे १२ किलोमीटर आहे तर ...
खेड तालुक्यातील वाडा, डेहणे परिसरातील गावांना राजगुरूनगर पेक्षा घोडेगाव जवळ पडते. वाड्यावरून घोडेगाव अवघे १२ किलोमीटर आहे तर खेड २७ किलोमीटर आहे. त्यामुळे या परिसरातील लोक बाजारहाट, दवाखना अथवा पुढे मंचर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, नाशिककडे जाण्यासाठी घोडेगाव मार्गे जातात.
वाडा, डेहणे परिसरातून दररोज घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूती व इतर उपचारासाठी लोक येत असतात. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठीदेखील विद्यार्थी घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयात येतात.
परंतु वाडा ते घोडेगाव हा रस्ता खराब असल्यामुळे लोकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. यासाठी हा रस्ता चांगला मजबूत व रुंद व्हावा अशी मागणी वाडा, डेहणेबरोबर घोडेगावमधील लोकांची आहे. आंबेगावचे माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांनी वाड्याचे सरपंच रघुनाथ लांडगे, माजी सरपंच जाकिर तांबोळी, तिफनवाडीचे सरपंच दीपक कडलक, दरकवाडीच्या सरपंच माया सुपे, सूरज दराडे, अमोल काळे यांची भेट घेतली व या रस्त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
-०-
चौकट
मंचर ते सुपेवाडी ही सध्या सुरू असलेली एसटी बस वाड्यापर्यंत पुढे न्यावी, वाडा ते घोडेगाव मिनी बस ठेवावी, अशी मागणी कैलासबुवा काळे यांनी केली आहे.
--
चौकट
आंबेगाव तालुक्याच्या हद्दीतील तळेकरवाडी ते खेड तालुका हद्द हा रस्ता केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर झाला आहे. यासाठी पावनेदोन कोटी रुपये मंजूर झाले असून निविदास्तरावर हे काम आहे. निविदा निश्चित झाल्याबरोबर हे काम सुरू होईल. तसेच खेड तालुक्याच्या हद्दीतील चार किलोमीटरचे कामदेखील पूरहानी दुरुस्तीमधून मंजूर असल्याचे उपअभियंता सुरेश पटाडे यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक: १६ घोडेगाव रस्ता दुरुस्ती मागणी.