'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

By नितीन चौधरी | Updated: April 16, 2025 16:33 IST2025-04-16T16:33:04+5:302025-04-16T16:33:49+5:30

निविदा प्रसिद्ध होऊन जुलैत ठरणार कंत्राटदार काम पूर्णत्वाला जाण्यास तीन वर्षे लागणार

Repairs to 'Temghar' will now begin in January; work will be done for only five months in the year | 'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला आता पुढील वर्षी जानेवारीत मुहूर्त लागणार आहे. अंदाजपत्रक तयार करणे त्याला मंजुरी मिळणे आणि त्यानंतर निविदा प्रसिद्ध होऊन कंत्राटदार निश्चित होणे, यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पावसाळ्यात काम करणे शक्य नसल्याने दुरुस्तीच्या कामासाठी जानेवारीचा वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जुन्या कंत्राटदाराकडून काम केले असते तर मेअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता आली असती. मात्र, आता नवीन कंत्राटदारच काम करेल, हे स्पष्ट झाले आहे.

टेमघर धरणातून पाणीगळती होत असताना दुरुस्तीस २०२० नंतर तब्बल पाच वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. धरणाच्या मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाने ७ फेब्रुवारीच्या बैठकीत ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.७१ टीएमसी पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. धरणातून २०१० पासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले. ही गळती २०१६-१७ मध्ये २ हजार ५८७ लिटर प्रतिसेकंद इतकी होती. त्यानंतर गळती रोखण्यासाठी दुरुस्तीच्या कामावर ९१ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला. यामुळे गळतीच्या प्रमाणात ९६ टक्के इतकी लक्षणीय घट होऊन गळतीचे प्रमाण १९७ लिटर प्रतिसेकंद एवढे आढळून आले. मात्र, २०२० पासून निधी असूनही मंजुरीअभावी गळती रोखता आली नव्हती. सध्या गळतीचे प्रमाण २३२ लिटर प्रतिसेकंद इतके झाले आहे. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणासाठी तसेच गळती रोखण्यासाठी उपययोजना करणे गरजेचे झाले होते.

सध्या ही गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रसिद्ध केल्या जातील. सर्वात कमी दर लावणाऱ्या संस्थेला हे कंत्राट बहाल करण्यात येईल. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही प्रक्रिया जुलैपर्यंत चालेल. त्याकाळात पावसाळा असल्याने धरणात पाणीसाठा असतो. त्यामुळे दुरुस्तीचे काम करता येणार नाही. १५ ऑक्टोबरपर्यंत धरण पूर्ण भरलेले असते. त्यानंतर वीजगृहातून पाणी सोडून साठा कमी करण्यात येणार आहे.

धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी होत असल्याने त्यावर खडकवासला विभागाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे. पाणीसाठा कमी करण्यास किमान डिसेंबर उजाडेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला जानेवारीचा मुहूर्त लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केेले. राज्य सरकारने मंजुरी दिल्यास १५ ऑक्टोबरपूर्वी काही दिवस लवकर पाणीसाठा कमी करता येऊ शकतो मात्र, त्यात केवळ १५ दिवस आधी धरण कामासाठी उपलब्ध होऊ शकते. मात्र, त्याासाठी पावसाळा कसा राहील, यावर सर्व अवलंबून असेल असेही ते म्हणाले. डिसेंबरच्या मध्यापर्यंत धरण रिकामे झाल्यास कंत्राटदाराला कामगार तसेच मशिनरीची जुळवाजुळव करण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी द्यावा लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला जानेवारीतच सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दुरुस्तीचे काम करण्यासाठी जानेवारी ते मे असे एकूण पाच महिनेच हाती असतील. हे काम करण्यासाठी पुढील तीन वर्षांच्या याच पाच महिन्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निविदेत काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Repairs to 'Temghar' will now begin in January; work will be done for only five months in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.