उपकाराची परतफेड

By admin | Published: January 8, 2017 03:29 AM2017-01-08T03:29:45+5:302017-01-08T03:29:45+5:30

नगरसेवकांच्या वशिल्यावर शिपाई, आरोग्य कर्मचारी, लिपिक अशा कोणत्या ना कोणत्या पदावर महापालिकेत नोकरी मिळवली. त्यांनतर कधी बदली थांबविण्यासाठी तर कधी पदोन्नती

Repayment repayment | उपकाराची परतफेड

उपकाराची परतफेड

Next

पिंपरी : नगरसेवकांच्या वशिल्यावर शिपाई, आरोग्य कर्मचारी, लिपिक अशा कोणत्या ना कोणत्या पदावर महापालिकेत नोकरी मिळवली. त्यांनतर कधी बदली थांबविण्यासाठी तर कधी पदोन्नती मिळविण्यासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची ज्यांनी मदत घेतली. असे महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी उपकाराच्या परतफेडीसाठी सज्ज झाले आहेत.
अर्थात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची निवडणुकीसंबंधी काम करण्यात ते सध्या व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. पालिकेतील ‘ड्युटी’वर येण्यापूर्वी सकाळीच अथवा ड्युटी संपल्यावर नगरसेवकांच्या कार्यालयावर त्यांना हजेरी लावणे भाग पडत आहे.
पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. निवडणूक विभागात आणि अन्य विभागांत काम करणारे, परंतु निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असलेले महापालिका कर्मचारी, अधिकारी विशिष्ट लोकांच्या मर्जीनुसार काम करतात, ही बाब निदर्शनास आणून देणारे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांनी महिनाभरापूर्वीच निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने महापालिकेला दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेत काही अधिकारी उपकाराच्या ओझ्याखाली काम करीत आहेत. काही नगरसेवक, पदाधिकारी यांचे महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. निवडणूक विभागात आणि निवडणुकीशी संबंधित कामाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून पारदर्शी काम होईल, याची शास्वती नाही. वर्षानुर्षांचे संबंध असलेल्या या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा ऐन निवडणुकीत आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी खुबीने वापर करून घेत आहेत. अगदी थेट प्रचारात पक्षाचा झेंडा घेऊन उतरण्याचेच बाकी आहे. महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी आतापासूनच छुप्या प्रकारे प्रचार यंत्रणेत राबू लागले आहेत. शक्य तेवढा वेळ ते उपकाराची परतफेड करण्यात घालवू लागले आहेत.
बदली रोखण्यासाठी, प्रशासनाची कारवाई थांबविण्यासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. दुसऱ्या खुष्कीच्या मार्गाचा अवलंब करून पदोन्नतीचा लाभ पदरात पाडून घेणारे कर्मचारी यांना आता प्रचार यंत्रणेत सक्रिय
करून घेतले आहे. त्यांनाही नाइलाजास्तव डबल ड्युटी करावी लागते आहे. पाच वर्षांतून एकदा असे काम करण्यास काय हरकत आहे, पुढेही अनेकदा या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीची गरज भासणार आहे. अशा मानसिकतेतून महापालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी निवडणूक प्रचाराचे काम करीत आहेत.
मतदार यादी तयार करताना कोणाच्या तरी सांगण्यानुसार पैसे घेऊन मतदार यादीत घोळ करणाऱ्या थेरगाव येथील निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. (प्रतिनिधी)

आॅन ड्युटी करताहेत ‘डबल ड्युटी’
महापालिकेत ड्युटीवर जण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या घरी अथवा कार्यालयात सकाळीच दोन ते तीन तास द्यायचे. नंतर घाईगडबडीत महापालिकेत कामावर जायचे. सायंकाळी सुटी झाल्यानंतर पुन्हा पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात जायचे. दोन वेळ हजेरी लावायची. महापालिकेच्या ड्युटीबरोबर पदाधिकाऱ्याच्या प्रचार यंत्रणेत सहभाग नोंदविण्याची ‘ड्युटी’सुद्धा कर्मचारी करीत आहेत. महापालिका प्रशासन आणि आयुक्त यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

Web Title: Repayment repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.