महालसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:41+5:302021-09-02T04:21:41+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगचा उडविला फज्जा फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा बारामती : बारामतीत आज महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी या वेळी ...
फिजिकल डिस्टन्सिंगचा उडविला फज्जा
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
बारामती : बारामतीत आज महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी या वेळी १९ हजार लसींचे डोस सर्व केंद्रांवर विभागुन वितरित करण्यात आले होते. मात्र, काही अपवाद वगळता बारामतीमध्ये एकच लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
बजाज ग्रुपच्या सौजन्याने जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण मंगळवारी (दि. ३१) तालुक्यात ८६ व शहरात ६ लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण आयोजित करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनी पहाटे ३ वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. या दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगच्या आणि कोरोनाच्या सर्वच नियमांकडे दुर्लक्ष झाले.
लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र, त्याला अपेक्षित यश आले नाही. गर्दीवर नियंत्रण करण्यात देखील त्यांना यश आले नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावरती पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. पोलिसांनी लसीकरण केंद्रावरती पोहोचताच सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. लसीकरण केंद्रा वरती गर्दी होऊ नये यासाठी अगोदरच टोकन वाटण्यात आले होते. प्रत्येक १०० टोकननंतर लस टोचवून घेण्यासाठी वेगळा वेळ दिला गेला होता. परंतु टोकन पद्धतीबाबत माहिती नसणाऱ्या नागरिकांनी देखील लसीकरण केंद्राबाहेर हजेरी लावल्याचे चित्र होते. महिला रुग्णालयाबाहेर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
फोटोओळी—बारामती एमआयडीसीत महिला रुग्णालयाबाहेर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
३१०८२०२१ बारामती—१२