पाच कलाकारांच्या आविष्कारातून सजलेले 'पुनरावृत्ती' सामूहिक कलाप्रदर्शन; आज होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:06 PM2024-06-20T14:06:01+5:302024-06-20T14:07:06+5:30

आदित्य चढार, हरिशा चेन्ननगोड, हर्ष दुरुगड्डा, नताशा सिंग आणि रवी मौर्य या समकालीन तरुण कलाकारांची कला अभिव्यक्ती प्रदर्शनात पाहायला मिळणार

Repetition collective art exhibition decorated with five artists inventions Inauguration will be held today in koregaon park | पाच कलाकारांच्या आविष्कारातून सजलेले 'पुनरावृत्ती' सामूहिक कलाप्रदर्शन; आज होणार उद्घाटन

पाच कलाकारांच्या आविष्कारातून सजलेले 'पुनरावृत्ती' सामूहिक कलाप्रदर्शन; आज होणार उद्घाटन

पुणे : पुनरावृत्ती किंवा पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करण्या-मांडण्यातून, स्मृती, अनुभव आणि स्वपरिचयाचा आपल्याला किती खोलवर उलगडा होऊ शकतो हे दर्शविणारे 'पुनरावृत्ती; हे पाच कलाकारांच्या आविष्कारांमधून साकार झालेले सामूहिक प्रदर्शन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. गुरुवारी (दि. २०) कोरेगाव पार्क येथील विदा हैदरी कंटेम्परी (व्हीएचसी) येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दि. २० जुलैपर्यंत महिनाभर या प्रदर्शनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

पुनरावृत्ती या संकल्पनेचा विविध अंगांनी विचार करणाऱ्या आणि अनेक माध्यमातून, तंत्र प्रक्रियांतून तिचा मागोवा घेणाऱ्या सर्जनशील कलाकारांचे हे सादरीकरण आहे. आदित्य चढार, हरिशा चेन्ननगोड, हर्ष दुरुगड्डा, नताशा सिंग आणि रवी मौर्य या समकालीन तरुण कलाकारांची कला अभिव्यक्ती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

इंदुर येथील आदित्य चढ़ार यांनी २०२० मध्ये इंदुर शासकीय ललित कला संस्थेतून ललित कला शाखेची पदवी मिळवली. नंतर त्याच संस्थेत त्यांनी २०२२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०१६ आणि २०१८ मध्ये कोची येथे झालेल्या मुद्धिरिस विद्यार्थी बायनेलसह, भारतभरातील अनेक सामूहिक प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या गेल्या आहेत. २०२३-२४ मीरा कला सन्मान पुरस्काराने त्यांच्या कलाविष्काराला ओळख प्राप्त करून दिली आहे.

हरिशा चेत्रनगोड यांनी सीएव्हीए महाविद्यालय कॉलेज, म्हैसूर येथून चित्रकलेची पदवी प्राप्त केली आणि बडोदाच्या ललित कला विद्याशाखेतून (एमएसयू) संग्रहालय अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ते बडोद्याला गेले. चेन्ननगोड यांची अमूर्त चित्रे भारतभरातील अनेक प्रदर्शनांतून सादर झाली आहेत. त्यांच्या कलाकृती पॅरिस आणि लंडनपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत.

हर्ष दुरुगड्डा हे भारतातील बहुविद्याशाखीय कलाकार आहेत, जे चामुख्याने शिल्पकला आणि कला सादरीकरणाशी संबंधित काम करतात. त्यांना २०२३ मध्ये दक्षिण आशियासाठी दिला जाणारा 'आर्ट्स फॅमिली इमर्जिंग आर्टिस्ट' पुरस्कार मिळाला. त्यांनी स्कल्पचर बाय द सी, ऑस्ट्रेलिया येथे 'रिओ टिंटो स्कल्पचर अवॉर्ड २०१७'सुद्धा जिंकला आहे.

जिरॉफ्ट, इराण येथे जन्मलेल्या नताशा सिंग यांनी त्यांची प्रॉडक्ट डिझाइनची पदवी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅम अँड टेक्नॉलॉजी, हैदराबाद इथे पूर्ण केली आणि पदव्युत्तर शिक्षण कम्युनिकेशन डिझाइन क्षेत्रात, सेंट्रल सेंट मार्टिन युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडन येथे घेतले. भारतातील प्राचीन कलापद्धती आणि सर्जनशील तंत्रज्ञान एकत्र आणण्यात त्यांना विशेष रस आहे. त्यांनी योगाचे जनरेटिव्ह शिल्प तयार करण्यासाठी संगणकीय व्हिजन आणि कॅमेऱ्यांसह काम केले आहे.

रवी मौर्य हे ग्वाल्हेर येथील असून, त्यांनी २०१५ मध्ये, आरएमटी विद्यापीठातून चित्रकलेमध्ये बीएफए पूर्ण केले. भारतातील अनेक एकल, तसेच आणि सामूहिक प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. प्रफुल्ल डहाणूकर आर्ट, सीआयएमए पुरस्कार, मध्य राज्य पुरस्कार आणि स्टेट गॅलरी ऑफ आर्ट, हैदराबादकडून अखिल भारतीय कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

Web Title: Repetition collective art exhibition decorated with five artists inventions Inauguration will be held today in koregaon park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.