पुण्यातील दादावाडीत शत्रुंजय गिरीराज मंदिराची प्रतिकृती; शुक्रवारी होणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:38 PM2018-01-17T12:38:18+5:302018-01-17T12:41:23+5:30
सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे : श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्टतर्फे सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) सकाळी १० वाजता विजय रामचंद्रसुरीश्वरजी म. सा. यांचे शिष्य परमपूज्य मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास शोभायात्रेने प्रारंभ सकाळी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरापासून होणार आहे. शोभायात्रेची सांगता दादावाडी मंदिराजवळ होणार आहे. या शोभायात्रेत मंदिराचे ट्रस्टी, पदाधिकारी, जैन समाजातील हजारो भाविक, नागरिक सहभागी होणार आहेत.
गुजरातमधील पालिताना येथील श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या तीर्थस्थानास लाखो भाविक भेट घेऊन दर्शन घेतात. श्रद्धा आणि कलेच्या दृष्टीने हे तीर्थ मंदिर जैन समाजाचे सर्वोच्च स्थान आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांनी ९९ वेळा या तीर्थ मंदिरास भेट दिली होती. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर आहे. चैत्र आणि कार्तिकी पौर्णिमेस हजारो जैन साधू, साध्वी यांचे महानिर्वाण या पवित्र स्थानी झाले आहे. अनेक भाविकांनी आपल्या मनाचा क्रोध, द्वेष, मोह, माया, लोभ यावर मात केली.
त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे नाव शत्रुंजय पडले आहे. हे तीर्थ मंदिर जमिनीपासून २ हजार फूट उंचीवर आहे. या ठिकाणी ७०० मंदिरे व हजारो प्रतिमा आहेत. या तीर्थ मंदिराकडे वाट चालून वर जावे लागते. या रस्त्यावर सुमारे ३,७५० पायºया आहेत.
मंदिरासाठी झटले कोलकाताचे कलाकार
शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दादावाडी मंदिरात साकारण्यात आली आहे. या मंदिराच्या कलाकृतीची प्रतिकृती तयार करण्यासाठी कोलकाता येथील ३० ते ३५ कलाकार गेली १ ते दीड वर्ष झटत होते. या मंदिरात तलाट्टी, नौतूण्क, दादाचा दरबार, कुंड, विश्रामस्थळ, पादुका (पगलियाजी), दर्शनीय स्थळांची प्रतिकृती उभारण्यात आली असल्याची माहिती संपत जैन यांनी कळविली आहे.