मराठीच्या अवहेलनेचे प्रत्युत्तर मतपेटीतून द्यावे , डॉ. श्रीपाद जोशी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:41 AM2019-03-20T02:41:02+5:302019-03-20T02:41:15+5:30
राज्यकर्त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. मराठीच्या प्रश्नांवर ते कायम मूग गिळून गप्प बसले आहेत.
पुणे - राज्यकर्त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. मराठीच्या प्रश्नांवर ते कायम मूग गिळून गप्प बसले आहेत. मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन डॉ. श्रीपाद जोशी यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या वतीने केले आहे.
प्रसिद्धिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार, सरकारने मराठी विद्यापीठाची स्थापना, मराठीला अभिजात दर्जा, मराठी भाषा धोरण, बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्याचा कायदा, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना, विधानपरिषदेवर साहित्य, संस्कृती क्षेत्रातील जाणकारांच्या नेमणुका, मराठी भाषा विभागाची अंदाजपत्रकीय तरतूद अशा सर्वच प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. सांस्कृतिक जाहीरनाम्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत मत मिळणार नाही, असे ठणकावून सांगितले पाहिजे, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्नांची, मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, राज्याच्या सांस्कृतिक धोरणासाठी एका पैशाचीही तरतूद केली नाही. भाषेसाठी कळकळीने काम करणाºया व्यक्ती आणि संस्थांची अवहेलना केली आहे. केवळ सत्तारूढ पक्षच नव्हे, तर विविध पक्षांचे नेतृत्व आणि नेत्यांनीही प्रभावी पावले उचलावीत.
सामान्य नागरिकांप्रमाणेच लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार, कलाकार, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, भाषाप्रेमी यांनी राज्यकर्त्यांना मराठीशी संबंधित प्रश्नांबाबत ठणकावून विचारावे, असेही जोशी यांनी म्हटले आहे. यासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.