४८ तासांत उत्तर द्या! खर्च कमी दाखवल्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 02:40 PM2024-05-03T14:40:15+5:302024-05-03T14:41:30+5:30
दोन्ही उमेदवारांना येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे...
पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान या नोटिशीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांकडून आलेला खुलासा अयोग्य असल्यास प्रशासनाला देखील समितीकडे जाण्याचा अधिकार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी (दि. १) झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा व योग्य वाटत नसल्याचे सांगत पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे.
४८ तासांत उत्तर द्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा २८ एप्रिलपर्यंत एकूण खर्च ३७ लाख २३ हजार ६१० इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा व योग्य वाटत नसल्याचे सांगत पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिशीनुसार याबाबतचा खुलासा पुढील ४८ तासांत देण्याचे सांगण्यात आले आहे. खुलासा न आल्यास ही तफावत मान्य असल्याचे समजून ती उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
पहिल्या तपासणीत चार जणांना नोटिसा
या मतदारसंघातील उमेदवारांची पहिली खर्च तपासणी २५ एप्रिलला झाली होती. त्यात ३८ पैकी ४ उमेदवारांनी खर्च सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या तपासणीपूर्वी खुलासा करण्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. दुसऱ्या खर्च तपासणीवेळी सर्व उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.
ही नोटीस मान्य नसल्यास खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे उमेदवारांना दाद मागता येणार आहे. त्यावर या बैठकीत सुनावणी होऊन निर्णय होईल. त्यात झालेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी, बारामती लोकसभा मतदारसंघ