बसच्या तक्रारी सांगा अन् १ वर्षाचा मोफत पास मिळवा; पीएमपीकडून "प्रवासी मित्र" अभिनव उपक्रम
By अजित घस्ते | Updated: August 21, 2023 14:38 IST2023-08-21T14:38:22+5:302023-08-21T14:38:51+5:30
अभिनव उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पीएमपीकडून ओळखपत्र मिळणार

बसच्या तक्रारी सांगा अन् १ वर्षाचा मोफत पास मिळवा; पीएमपीकडून "प्रवासी मित्र" अभिनव उपक्रम
पुणे: पीएमपी सक्षमीकरणासाठी 'लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक असून या लोकसहभागातून पीएमपीला प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी पीएमपीकडून “प्रवासी मित्र" हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पीएमपीकडून ओळखपत्र मिळणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पीएमपी मार्फत करण्यात येत आहे.
तथापि या ओळखपत्रावर बस प्रवासाकरिता कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. परंतु प्रवासी मित्रांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून १० पीएमपीएमएल प्रवासी मित्रांची निवड करून त्यांना पीएमपीच्या वर्धापनदिनी १ वर्षांचा मोफत पास देण्यात येईल.
उपक्रमात सामिल होण्यासाठी
"पीएमपी प्रवासी मित्र" होऊ इच्छिता असणा-यांनी Ipropmpml1@gmail.com या मेल आयडी वर संपूर्ण नाव, पत्ता, व्यवसाय , मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, रंगीत फोटो आयडेंटिटी साईज, प्रवासी मित्र म्हणून विनामोबदला काम करण्यास तयार असलेचे संमतीपत्र. इ. माहिती पाठवावी.
पीएमपी ”प्रवासी मित्र" ही माहिती देऊ शकतात
ड्रायव्हर कंडक्टर यांचे वर्तन, सुस्थितीत नसलेले बसथांबे , नवीन बसमार्गांबाबतच्या सूचना, बसशेडची आवश्यकता, पीएमपीएमएल कर्मचा-यांची चांगली व उल्लेखनीय सेवा याबाबत सुचना देऊ शकता.