विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदवा तक्रारी

By admin | Published: July 16, 2016 01:17 AM2016-07-16T01:17:41+5:302016-07-16T01:17:41+5:30

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने नवीन विद्याशाखांना, अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून, विद्यापीठानेही संलग्न महाविद्यालयांमध्ये अनेक कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

Report complaint on university's website | विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदवा तक्रारी

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदवा तक्रारी

Next

विद्यापीठातील तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी थेट विद्यापीठाला कळविता येईल. त्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे यंत्रणा उभी केली जाणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने नवीन विद्याशाखांना, अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून, विद्यापीठानेही संलग्न महाविद्यालयांमध्ये अनेक कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांना करिअर म्हणून कसे पाहता याबाबत डॉ. वासुदेव गाडे यांनी ‘लोकमत’च्या लोकसंवाद या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त
केले. तसेच विद्यापीठात गेल्या चार वर्षांतील आपल्या कार्याचा आढावा घेतला.
गाडे म्हणाले, विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क आकारतात. प्रवेश रद्द करून दाखला घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार वर्षांचे शुल्क भरण्यास सांगितले जाते. काही विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून चुकीची वागणूक दिली जाते. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या लिंकवर विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणविषयक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे नमूद करून गाडे म्हणाले, आयसर, मेलबोअर विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा संयुक्त अभ्यासक्रम यंदा सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणारा विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास कोणत्याही विषयास प्रवेश घेऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रथमच तीनही संस्थांचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कौशल्य अभ्यासक्रमाचे विविध अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवीसाठी सुरू करण्यात आले असून, यंदा अभियांत्रिकी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी आणि त्यानंतर इतर शाखेस सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश न घेता विद्यार्थी विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागा पूर्णपणे भरल्या जात आहेत. त्यातच विविध औद्यौगिक कंपन्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संधी देण्याऐवजी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना संधी देणे पसंत करत आहेत. विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेक विद्यार्थी संशोधनाकडे वळत आहेत, असेही गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांसाठी अ‍ॅकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर्स (एपीआय)चे नियम लागू केल्याने प्राध्यापकांचे संशोधनाकडे व विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे लक्ष राहिलेले नाही. त्यामुळे प्रथमत: एपीआयमधून प्राध्यापकांना मुक्तता मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील अहवाल यूजीसीला सादर करण्यात आला असल्याची माहिती गाडे यांनी दिली.
नेट-सेट परीक्षेला पीएच.डी. पदवीचा पर्याय ठेवल्याने गेल्या काही वर्षांत पीएच.डी.च्या माध्यमातून दर्जाहीन संशोधन झाले आहे. मात्र,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी.चा दर्जा चांगला
ठेवण्यासाठी प्लॅगॅरिझमचे सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले आहेत.
यूजीसीच्या सर्व
नियमावलींचे काटेकोरपणे पालन
केले जात असून, विद्यापीठानेही
काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. परंतु, पीएच.डी.च्या मार्गदर्शकांबाबत यूजीसीने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक चांगले प्राध्यापक ६0 वर्षे वयानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकत नाहीत. त्यामुळे यूजीसीने याबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठात शासनमान्य पदाच्या प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. शासनाने प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास परवानगी मिळण्याबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. परंतु, विद्यापीठ फंडातून प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांसाठी मार्गदर्शक उपलब्ध होतील.

Web Title: Report complaint on university's website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.