पिकांचे नुकसान झाल्यास लगेच ॲपमध्ये माहिती नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:43+5:302021-07-24T04:08:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सुरू झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा मागणीबाबत सतर्क ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात सुरू झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा मागणीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यांचे नुकसान होईल, त्यांनी लगेच ॲपमध्ये नोंद करावी, म्हणजे मदत मिळण्यास अडचणी येणार नाहीत.
विमा कंपन्याकडून विमा मागणी नाकारण्याचे प्रकार मोठ्या संख्येने घडतात. पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्याची सूचना ७२ तासांच्या आत द्यावी, त्यानंतर विशिष्ट वेळातच अधिकृत पंचनामे पाठवावेत. सर्व गोष्टी ऑनलाईनच कराव्यात, असे नियम शेतकऱ्यांनी पाळले पाहिजेत. ते पाळले नाहीत, तर विमा मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
सध्या खरीप पीक पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास ज्या शेतकऱ्यांनी कंपनीने दिलेल्या मोबाईल अँपमधून तत्काळ माहिती भरावी. याबाबत कोणतीही अडचण आल्यास नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.