धोकादायक ठिकाणांची माहिती द्या, स्मार्ट सिटीला पालिकेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:40+5:302021-07-24T04:09:40+5:30
पुणे : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून धोकादायक ठिकाणांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांना दिली जाणे अपेक्षित असताना, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाच ...
पुणे : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून धोकादायक ठिकाणांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांना दिली जाणे अपेक्षित असताना, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाच स्मार्ट सिटीकडून सदर माहिती वेळेत मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष व स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये समन्वय वाढवावा असे सूचित करतानाच, स्मार्ट सिटीनेही सदर माहिती वेळेत महापालिकेला द्यावी असे आदेश शुक्रवारी देण्यात आले आहेत़
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व खडकवासला धरणही भरल्याने सध्या नदी दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे यांनी महापालिका इमारतीतील आपत्ती निवारण कक्षाला भेट दिली. यावेळी उपायुक्त माधव जगताप, राजेंद्र मुठे, गणेश सोनूने आदी अधिकारीही उपस्थित होते़
पुणे महापालिका हद्दीत स्मार्ट सिटीच्यावतीने शहरातील धोकादायक असलेले ओढे-नाले, नद्या अशा ४० ठिकाणी सेंसर लावण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस व काही भागात पाणी शिरले असतानाही, स्मार्ट सिटीकडून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कक्षाला फोन करून चौकशी केली असता, शहरातील पाच ठिकाणी अलर्ट असल्याचे समोर आले. परंतु ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहितीच नव्हती, त्यामुळे या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे़
-----------
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, शहरात ४० ठिकाणी लावलेले सेंसर, नदीतील पाणी पातळी, धोकादायक ठिकाणे याची माहिती स्मार्ट सिटीने लागलीच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावी असे सांगण्यात आले आहे़
डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे मनपा
----------------------------