रिपोर्ट एकाचा, ट्रीटमेंट दुसऱ्यावर; पुण्याच्या पटेल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 01:30 PM2024-08-20T13:30:10+5:302024-08-20T13:30:23+5:30
चूक आमच्या लगेच लक्षात आली त्यानंतर आम्ही तातडीने रुग्णावरील उपचार बदलले, रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया
लष्कर : सामान्य थंडी, ताप, सर्दीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची रक्त तपासणी करण्यात आली आणि नंतर थेट रुग्णाच्या नातेवाइकाला फोन करून त्याच्या दोन्ही किडन्या निकामी असून, रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले गेले. इतकेच नव्हे तर थेट आयसीयू (अतिदक्षता विभागात) दाखल करून त्यासाठी दहा हजार रुपये आगाऊ रक्कम भरून घेण्यात आली. रात्रीच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाइकाने रक्ताचा अहवाल मागितल्यावर तो अहवाल आपल्या संबंधित नातेवाइकाचा नाहीच हे उघड झाले. याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. हा प्रकार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात घडला आहे.
त्याचे घडले असे, रविवारी कॅन्टोन्मेंट हद्दीतील धोबी घाट येथे राहणारा २३ वर्षीय युवक संकेत वायदंडे याला थंडी, ताप, सर्दी, अंगदुखी दोन दिवसांपासून होती, त्यामुळे तो पटेल रुग्णालयात पुरुष वॉर्डात उपचारासाठी दाखल झाला. त्यावेळी त्याची रक्त तपासणी करण्यात आली. सायंकाळी आठच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाइकाला रुग्णालय प्रशासनाने फोन करून तुम्ही लवकर या, तुमच्या रुग्णाची तब्येत अतिशय खराब आहे. त्याच्या किडन्या निकामी झाल्या आहेत, अशी माहिती दिली. त्यामुळे संकेत वायदंडे यांचे नातेवाईक घाबरले. रुग्णालय प्रशासनाने त्याला अतिदक्षता विभाग दाखल केले आणि दहा हजार रुपये ॲडव्हान्स भरण्यास सांगितले त्यानुसार रुग्णांच्या नातेवाइकांनी काही रक्कम भरलीसुद्धा. रात्री उशिरा रुग्णाच्या काही नातेवाइकांनी रक्त चाचणीचा अहवाल पाहण्यासाठी मागितला. तो अहवाल पाहिल्यावर त्यावर संकेत याचे नाव नव्हते तर दुसऱ्या ४२ वर्षीय रुग्णाचे नाव होते. रुग्णाच्या नातेवाइकांनी ती चूक डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि मग तातडीने त्याच्यावरील उपचार थांबविले. रुग्णाचा रक्ताचा खरा अहवाल पाहिल्यावर त्यात कोणताही दोष नव्हता.
रुग्णाच्या नातेवाइकांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज
रुग्णालय प्रशासनाकडून आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मात्र त्यावर एफआयआर आजपर्यंत पोलिसांनी दखल केलेले नाही, तर रुग्णालय प्रशासनानेदेखील नातेवाइकांविरोधात तक्रार दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
हा तर ह्युमन एरर...आम्ही लगेच चूक सुधारली
याबाबत आम्ही रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा तपासे यांना त्यांची बाजू विचारली असता हा केवळ ह्युमन एरर आहे, आमच्या कर्मचाऱ्यांचा हे लक्षात आले असता लगेच आम्ही चूक दुरुस्त केली, असे त्या म्हणाल्या. मात्र, नातेवाइकांच्या सांगण्यानुसार ही चूक त्यांनीच डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली.
रुग्णाचे नातेवाईक सांगत आहेत तेवढी मोठी ही समस्या नाही, ही मानवी चूक आहे. चूक आमच्या लगेच लक्षात आली त्यानंतर आम्ही तातडीने रुग्णावरील उपचार बदलले. ज्या कर्मचाऱ्यांकडून ही चूक झाली आहे त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोषींवर निश्चित कारवाई होईल. -डॉ. उषा तपासे, निवासी वैद्यकीय अधीक्षक, सरदार पटेल रुग्णालय