लाल मातीतून सोनं जिंकण्याचं स्वप्न पाहणारी पोरं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:07 AM2023-05-23T10:07:17+5:302023-05-23T10:09:40+5:30
लाल मातीतून सोनं जिंकण्याचं स्वप्न पाहणारी ही पोरं सणासुदीलाही मातीत कुस्तीचे डाव शिकविण्यात मग्न असतात...
- उमेश गो. जाधव
पुणे : ‘चल बाळा उठायचं उठायचं वरच्याला खाली घ्यायचं. डबल ताकद लागतीया, पण ऱ्हायचं उभं. उभा राहा, उभा राहा चल. बराबर हे, बराबर हे...सोडायचं न्हाय, सोडायचं न्हाय’ हौदात भिडलेल्या दोन पहिलवानांना वस्ताद समजावत होता. पोरंही डबल ताकद लावून लढत होती. सगळी मातीनं माखलेली पर कुणीच हार मानाय तयार न्हाय. पुण्यातील तालमी, कुस्ती संकुलांमध्ये नियमितपणे दिसणारं हे आश्वासक चित्र. ज्या मातीनं आपल्याला भरभरून दिलं त्याच मातीत मल्लविद्या करून घराण्याचं, देशाचं नाव मोठं करण्यासाठी दिवस-रात्र पुण्यात असंख्य पहिलवान मेहनत घेत आहेत. लाल मातीतून सोनं जिंकण्याचं स्वप्न पाहणारी ही पोरं सणासुदीलाही मातीत कुस्तीचे डाव शिकविण्यात मग्न असतात.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणात पहिलवानांचा ओढा पुण्याकडे वाढला आहे. देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर घराण्याचं, देशाचं नाव मोठं करायचं या एकाच स्वप्नाने त्यांना झपाटलं आहे.
प्रवीण पांगारकर हा भोरपासून दहा किमी अंतरावरील मोहरी गावातून पुण्यात कुस्ती शिकण्यासाठी आला आहे. पुण्यात देवळाची तालीम येथे वस्ताद नामदेव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तो सहा वर्षांपासून सराव करत आहे. २० वर्षांचा प्रवीण सांगतो की, आजोबा, वडील यांना कुस्तीची आवड होती. दोघंही देवळाची तालीम येथे सराव करायचे. त्यामुळे मी लहान असतानाच त्यांनी मला गावातील तालमीत दाखल केलं. त्यामुळं आवड निर्माण झाली. वडिलांचा दुधाचा व्यवसाय आहे. मात्र, तरीही ते दररोज पाच लिटर दूध मला पाठवतात. परिस्थितीमुळे त्यांना कुस्तीत मोठी कामगिरी करता आली नाही; पण त्याची त्यांना खंत नाही. मला ते नेहमीच प्रोत्साहन देतात.
प्रवीणचे वडील त्याला सांगतात की, खेळात हार-जीत होतच असते. फक्त प्रामाणिकपणे मेहनत घ्यायची. पडणं, पाडणं ही दोन पायाची भिंत आहे. कष्ट घेणाऱ्याला माती कधी सोडत नाही काही तरी परतावा देतेच. मातीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करायचा. प्रवीणचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न आहे. मात्र, त्याचवेळी त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकही खुणावते. देवळाची तालीम येथे मॅट नसल्यामुळे शिवरामदादा तालमीत तो अभिजित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. प्रवीणसारखेच अनेक खेळाडू पदकाचं स्वप्न जगत आहेत आणि कुस्तीला वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहेत.
सगळ्या महाराष्ट्रातील मुलं कुस्ती शिकण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. पोरं नियमितपणे सराव करून जिद्दीनं खेळत आहेत. त्यामुळे पहिलवानांना चांगले दिवस आले आहेत.
- काका पवार, अर्जुन पुरस्कार विजेते
आपले खेळाडू केवळ महाराष्ट्र केसरी जिंकण्याचेच लक्ष्य ठेवतात. मात्र, त्यांनी आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचे ध्येय ठेवावे. महाराष्ट्र सरकारनेही खेळाडूंना कोणत्याही विभागात नोकरी देऊन सामावून घेतल्यास खेळाडूंची कामगिरी आणखी सुधारेल. गेल्या सहा वर्षांत राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली आहे ही सकारात्मक बाब आहे.
- अभिजित कटके, हिंद केसरी
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार खेळाडूंनी सराव करणं ही काळाची गरज आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही राज्यभरातून कुस्ती शिकण्यासाठी खेळाडू पुण्यात येतात. परिस्थितीची जाणीव ठेवून हे खेळाडू सातत्याने सराव करत असतात. आपल्यालाही काही तरी जिंकता यावं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते मन लावून सराव करतात. त्यामुळे भविष्यात पुण्यातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास वाटतो.
- शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी