नगर रस्ता बीआरटीला प्रजासत्ताकदिनी मुहूर्त
By Admin | Published: December 20, 2015 02:24 AM2015-12-20T02:24:59+5:302015-12-20T02:24:59+5:30
महापालिकेकडून बांधून तयार असलेल्या ‘संगमवाडी ते नगर रस्ता बीआरटी’साठी २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे; मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी
पुणे : महापालिकेकडून बांधून तयार असलेल्या ‘संगमवाडी ते नगर रस्ता बीआरटी’साठी २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे; मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून टर्मिनलची अट घातली असतानाही ही टर्मिनलची जागा मिळण्याआधीच महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा मार्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, टर्मिनलसाठी केसनंद फाटा येथील ९ एकर जागेबाबत महापालिकेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, त्या ठिकाणची अडीच एकर जागा जिल्हा प्रशासनाकडून देण्याची तयारी दर्शविली आहे. ही जागा मिळण्यास उशीर होणार असल्याने, ती मिळेपर्यंत काही महिने ही जागा भाडेकराराने घेण्यात येणार आहे.
महापालिकेकडून ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ आणि ‘संगमवाडी ते खराडी’ या मार्गावर बीआरटी मार्ग उभारलेला आहे. त्यातील पहिला मार्ग तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेला आहे, तर नगर रस्त्याचा मार्ग ९० टक्के पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरही बीआरटी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र हा मार्ग सुरू करण्यासाठी बस टर्मिनल आवश्यक असून तो नसल्यास, हा मार्ग सुरू करणार नसल्याची भूमिका पीएमपीकडून घेण्यात आलेली आहे.
त्यामुळे बांधून तयार असलेला हा मार्ग गेल्या वर्षभरापासून पडून आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडून टर्मिनलसाठी जागा शोधण्यात येत होती. सुरुवातील वाघोली जकातनाक्या जवळील जागा पाहण्यात आली होती; मात्र ही जागा मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर आत असल्याने, तिचा फायदा नव्हता. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून दुसऱ्या जागेची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासना कडून केसनंद फाटा येथील ९ एकर जागा पाहण्यात आली होती. या जागेबाबत आज झालेल्या बैठकीत या जागेतील ४ एकर जागेचे वाटप झालेले असून, उर्वरित पाच एकर जागेतील अडीच एकर बस टर्मिनलसाठी जागा देण्याबाबत मान्यता आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही जागा मिळण्यास उशीर लागणार असल्याने काही महिने ही जागा भाडेकराराने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.(प्रतिनिधी)
एका महिन्याचा कालबद्ध कार्यक्रम
ही जागा निश्चित झाल्याने हा मार्ग सुरू करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम महापालिका
प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार, प्रत्येक विभागास
काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, हे
काम पूर्ण झाल्यानंतर, ‘पर्णकुटी
ते येरवडा’ आणि ‘येरवडा ते
खराडी जकात नाक्या’पर्यंत ही बीआरटी धावणार आहे. त्यानंतर टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर, ती वाघोलीपर्यंत धावणार आहे. त्यानुसार, या मार्गाचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे.