लाेटांगण घालून सांगताे, शुटींग थांबवा ; इंदाेरीकर महाराजांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:47 PM2020-02-18T13:47:41+5:302020-02-18T13:48:37+5:30
माेशीमध्ये कीर्तन सुरु हाेण्याआधी इंदाेरीकर महाराजांनी माध्यामांना शुटींग न करण्याची विनंती केली.
मोशी : माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. माणसाचे नाव झाले, पैसा आला की, त्याला शत्रू निर्माण होतात. त्यातूनच मला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. दोन दिवसात या लोकांनी माणूसच संपवला, हे योग्य नाही. त्यामुळे लोटांगण घालून सांगतो, कॅमेरे बंद करा, आता शुटींग थांबवा, असे भावनिक आवाहन हभप इंदोरीकर निवृत्तीमहाराज देशमुख यांनी मोशी येथे केले.
समस्त मोशीकरांतर्फे छत्रपती शिवाजीमहाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सोमवारी (दि. १७) इंदोरीकरमहाराज यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांची या वेळी बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. इंदोरीकर महाराज म्हणाले, ‘‘गेली पंचवीस - सत्तावीस वर्षे मी कीर्तन करत आहे. एवढ्या वर्षात कधी अडचण आली नाही, आक्षेप आले नाहीत. आत्ताच अडचणी निर्माण झाल्या कशा? बरं मी जे तेव्हा बोलतोय तेच मी आता बोलत आहे, हे आपण सर्व जाणताच. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला.’’
‘व्हिडीओ शुटींग करू नका’
इंदोरीकरमहाराजांचे कीर्तन होणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी कॅमेऱ्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र कीर्तनाच्या सुरुवातीलाच इंदोरीकर महाराज यांनी कॅमेरे बंद करण्यास सांगून व्हिडीओ शुटींग करू नका, असे आवाहन केले. त्यानंतर शुटींगचे कॅमेरे बंद करण्यात आले.