VIDEO: "वेळ मागितली तरीही राज ठाकरेंची भेट झाली नाही..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:30 PM2024-03-12T14:30:32+5:302024-03-12T14:50:57+5:30
सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला....
पुणे : वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मोरे हे मनसेकडून सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या बेधडक स्टाईलमुळे ते समाज माध्यमावर प्रसिद्ध आहेत. तसेच कात्रजसह पुणे शहरात मोरेंचा दांडगा जनसंपर्क आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला. 'वसंत मोरे हेच आमचा पक्ष, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. साध्या कार्यकर्त्यापासून वसंत मोरे यांनी आम्हाला संधी दिली होती, अशी प्रतिक्रिया पर्यावरण सेनेच्या नितीन जगताप यांनी दिली.
राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्षातीलच काही नेत्यांचा मला विरोध होता. ते लोक वरिष्ठांपर्यंत चुकीचा निरोप पाठवत होते. राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली पण त्यांची वेळ मिळाली नाही. मनसेची पुण्यातील कार्यकारिणी चुकीच्या हातात असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना वसंत मोरे भावुक झाले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणेकरांनी लढायलं सांगितले तर मी नक्की लढणार. शहरातील नागरिकांसाठी मी लढणार. पुणेकर जे म्हणतील तो मी निर्णय घेणार. शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझा निर्णय पुढील दोन दिवसांत जाहीर करेन, असंही मोरे म्हणाले.
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, मला वारंवार त्रास दिला जात होता. माझ्यासोबत असलेल्या लोकांना डावलले जात होते. मी वारंवार तक्रारी साहेबांपर्यंत पोहचवल्या, परंतु त्यानंतरही काहीच बदल झाला नाही. माझ्यावर अन्याय होत असेल, माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असेल तर त्या पक्षात न राहिलेलेच बरे असंही मोरे म्हणाले.