छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन केंद्र उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:40+5:302021-09-25T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा घेणारा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर संशोधन करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीमध्ये संशोधन केंद्र आणि जगभरातील सर्वोत्तम ग्रंथालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात केली.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त डॉ. मुळे यांचा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सामंत यांनी रत्नागिरीत शिवाजी महाराज यांच्यावर संशोधन करता येईल, असे केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. संवाद पुणे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी या वेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, रत्नागिरीतील संशोधन केंद्राच्या ठिकाणी जागतिक दर्जाचे भव्य ग्रंथालय उभारण्यात येणार असून शिवाजी महाराजांसह महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासाची पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत,
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, डॉ. मुळे यांनी यशाच्या माध्यमातून आकाशात अनेक भराऱ्या घेतल्या तरीही त्यांनी मातीशी नाळ तुटू दिली नाही. संधी मागून मिळत नाही ती खेचून आणावी लागते असे काम त्यांनी केले आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून लवकरच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रबोधन या नियतकालिकाच्या शंभर अंकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात येणार
सत्काराला उत्तर देताना डॉ. मुळे म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र झळकला पाहिजे, ही आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. यशासाठी शंभर पावले टाकण्याची प्रतिज्ञा केली जाते पण शंभरावे पाऊल टाकताना मराठी तरुण अडखळतो. यामुळेच मराठी माणूस मागे राहिला ही बोचरी जाणीव आहे. महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाय हवी, राजकारण वाईट नाही, सगळ्या चांगल्या व्यक्तींनी राजकारणात जरूर यावे. समाजपरिवर्तन झाले पाहिजे, निवृत्ती ही प्रवृत्ती व्हावी आणि रिटायरमेंट ही रि-अटायरमेंट असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सावनी विनिता यांनी सूत्रसंचालन केले तर निकिता मोघे यांनी आभार मानले.
----------------------