‘पीओपी’च्या पुनर्वापरासाठी तंत्रज्ञान विकसित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:20 AM2018-04-20T03:20:02+5:302018-04-20T03:20:02+5:30
विघटन होत नसल्याने पर्यावरणाला हानीकारक ठरलेल्या ^‘प्लास्टर आॅफ पॅरिस’चा (पीओपी) पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
पुणे : विघटन होत नसल्याने पर्यावरणाला हानीकारक ठरलेल्या ^‘प्लास्टर आॅफ पॅरिस’चा (पीओपी) पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. वापरलेल्या ‘पीओपी’वर सोप्या पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर तयार झालेल्या ‘पीओपी’चा वापरही पूर्वीप्रमाणेच करता येत असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
घरगुती सजावट, भव्य देखावे, मूर्ती तयार करण्यासाठी दररोज हजारो टन पीओपीचा त्यासाठी वापर केला जातो; पण एकदा वापरलेल्या ‘पीओपी’चा पुन्हा वापर करता येत नसल्याने त्याचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही प्रचंड आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील सायन्स पार्क विभागाने यावर संशोधन करून नवीन प्रक्रिया विकसित केली आहे. याविषयी डॉ. जयंत गाडगीळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गाडगीळ यांच्यासह त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के यांनी यावर संशोधन केले आहे.
गणेश मंडळे, संस्थांशी बोलणार
‘पीओपी’चा पुनर्वापर करता येत असल्याने ही बाब संशोधनापुरती मर्यादित न राहता ते व्यापक स्वरूपात प्रत्यक्षात यायला हवे. त्यासाठी संस्था, गणेश मंडळांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाकडून पालिका प्रशासन, गणेश मंडळांशी चर्चा केली जाईल. पीओपीच्या पुनर्वापरासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत, असे डॉ. जयंत गाडगीळ यांनी सांगितले.
पुण्यात पीओपीपासून बनविण्यात आलेल्या किमान सहा लाख मूर्तींचे मागील वर्षी विसर्जन झाले. महाराष्ट्रात तर ही संख्या कितीतरी पट आहे. यामुळेच गणपती उत्सवाचे वेध लागले की, त्या बरोबरच पीओपीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे काय करायचे, असा सूरही उमटतो. कारण, पीओपी किंवा त्याच्या भुकटीचा पुन्हा वापर करता येत नाही, असे आत्तापर्यंत मानण्यात आले होते.
हीच बाब घरात व समारंभांमध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणाºया पीओपीलाही लागू पडते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले हे संशोधन अत्यंत उल्लेखनीय आहे.