दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे महत्वाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 09:01 PM2020-12-26T21:01:40+5:302020-12-26T21:03:08+5:30
पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र काम करणार ..
पुणे (उरुळी कांचन) : राज्याच्या पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातुन दिवसाला वीस लिटर देणारी गीर जातीची गाय व दहा ते बारा लिटर दूध देणारी सानेन जातीची शेळी विकसित करण्याचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या कामात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बायफ संस्थेचीही मदत घेतली जाणार आहे. राज्यात दूध उत्पादन वाढण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असे मत राज्याचे पशु संवर्धन व क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी येथे व्यक्त केले.
राज्याचे पशु संवर्धन व क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी आमदार अशोक पवार यांच्यासमवेत शुक्रवारी सायंकाळी उरुळी कांचन येथील बायफ (बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान) या संस्थेला भेट दिली. या भेटीत केदार यांनी बायफ संस्थेकडुन गीर गाय व सानेन शेळीवर करण्यात येत असलेल्या संशोधनाबाबत माहिती घेतली. यावेळी आमदार अशोक पवार, पशुधन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. धनंजय परकाळे, बायफचे अध्यक्ष डॉ. गिरीष सोहनी, वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक पांडे, उपाध्यक्ष व्ही. वाय. देशपांडे, डॉ. जयंत खडसे, डॉ. स्वामीनाथन, कर्नल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनिल केदार म्हणाले, ब्राझील या देशाने सुमारे वीस वर्षापुर्वी आपल्याच देशातुन गीर गायी नेल्या व वीस वर्षाच्या काळात ब्राझील या देशातील संशोधकांनी गीर गाईवर वेगवेगळे प्रयोग करुन तिचे दूध प्रतिदिन वीस लिटरवर नेले. ब्राझील या देशाने विकसित केलेली व दिवसाला वीस लिटर दूध देणारी गीर जातीची गाय राज्यात आणत आपल्याकडेही पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातुन मागील काही महिन्यांपासुन संशोधन सुरु आहे.
सानेन प्रजातीची शेळी सध्या कॅनडा देशात खुपच प्रसिध्द आहे. ही शेळी आपल्या राज्यातील वातावरणात टिकणार असल्याचे संशोधनातुन पुढे आले आहे. राज्यात पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातुन या शेळीचे उत्पादन करण्याबाबत संशोधन सुरु आहे. ही शेळी आपल्या राज्यात आल्यास ग्रामीण भागातील शेतकरी सक्षम होईल अशी आशा आहे. त्यामुळे दूध उत्पादनाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र काम करणार आहेत,