‘जयकर’ डिजिटल लायब्ररीची अभ्यासकांना अद्याप प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 03:41 AM2019-03-13T03:41:48+5:302019-03-13T03:41:59+5:30

दुर्मिळ चित्रपटांपासून दूरच; चार वर्षे गेली उलटून

The researchers of 'Jayakar' digital library are still waiting | ‘जयकर’ डिजिटल लायब्ररीची अभ्यासकांना अद्याप प्रतीक्षाच

‘जयकर’ डिजिटल लायब्ररीची अभ्यासकांना अद्याप प्रतीक्षाच

Next

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारातील जयकर बंगल्यात साकार होत असलेल्या ‘डिजिटल लायब्ररी’मध्ये खजिन्यातल्या दुर्मिळ चित्रपटांचा आस्वाद संगणकावर पाहण्याची संधी चित्रपटप्रेमी आणि अभ्यासकांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र चार वर्षे उलटली तरी अद्याप या लायब्ररीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागलेला नाही. ही लायब्ररी कधी सुरू होणार? असा सवाल अभ्यासक, तज्ज्ञ आणि रसिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या वास्तूमध्ये बॅरिस्टर जयकर यांच्या स्मृती जपल्या जाव्यात या दृष्टीने संग्रहालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. जयकर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. येत्या दोन महिन्यांत ‘डिजिटल लायब्ररी’ सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिले आहे.

गेली अनेक वर्षे एनएफएआयच्या आवारातील जयकर बंगला धूळ खात पडून होता. याच बंगल्यात पुणे विद्यापीठाची आखणी करण्यात आली होती. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांचे १९४७ ते १९५६ या काळात बंगल्यात वास्तव्य होते. त्यानंतर १९६४ मध्ये येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरू झाल्याने बंगल्याची मालकी संस्थेकडे गेली. बंगल्याला ‘मातृस्मृती’चे नाव आहे. मात्र तो जयकर बंगला याच नावाने प्रसिद्ध आहे. या बंगल्यात एफटीआयआयचे मुलींचे वसतिगृह होते. तिथे अभिनेत्री जया भादुरी, शबाना आझमी, गीता खन्ना तसेच पार्वती मेनन यांचे वास्तव्य होते. एफटीआयआयच्या संचालकाचे कार्यालय येथे होते. मात्र, काही काळानंतर तेही बंद झाल्याने हा बंगला वापराविना पडून होता. त्यामुळे जयकर बंगल्यात चित्रपटप्रेमींसाठी डिजिटल लायब्ररी उभारण्याचा प्रकल्प संग्रहालयातर्फे हाती घेण्यात आला. या बंगल्याला हेरिटेज वास्तूचा दर्जा असल्याने टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यात आले. चार वर्षांच्या नूतनीकरणातून बंगल्याला नवी झळाळी प्राप्त झाली. अप्रतिम लाकडी कलाकुसर हे या बंगल्याचे वैशिष्ट्य आहे. बंगल्याचे नूतनीकरण करताना मूळ वास्तूला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही.

नूतनीकरण झाले पूर्ण...
जयकर बंगल्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. डिजिटल लायब्ररीसाठी आवश्यक स्क्रीन तसेच कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक साहित्य संग्रहालयाला उपलब्ध झाले असून लवकरच जोडणीचे काम पूर्ण केले जाईल, असे संग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे.

या बंगल्यात बँरिस्टर जयकर यांचे छोटेखानी स्मारक करण्याचा मानस आहे. जयकर कुटुंबीयांकडून जयकर यांची दुर्मीळ छायाचित्रे मिळण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. याशिवाय जयकर बंगल्याचे डिझाइन कुणी केले? वास्तुरचनाकार कोण होता? याच्या माहितीबरोबरच जयकर यांनी ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’ नावाने त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा १९५८ च्या फिल्म मॅगझिनमध्ये उल्लेख आहे. ते देखील आम्ही मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. दोन महिन्यांत ही डिजिटल लायब्ररी खुली केली जाईल
- प्रकाश मगदूम, संचालक एनएफएआय

Web Title: The researchers of 'Jayakar' digital library are still waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.