ब्राह्मण समाजाला आरक्षण अवघड, समाजाला दुखवू नका : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 09:16 AM2022-05-22T09:16:57+5:302022-05-22T09:17:48+5:30

शरद पवार यांच्यासमवेत राज्यातील ब्राह्मण समाजाच्या काही संघटनांच्या प्रतिनिधींची शनिवारी दुपारी बैठक झाली. 

Reservation difficult for Brahmin community dont hurt Brahmin community said ncp supremo Sharad Pawar | ब्राह्मण समाजाला आरक्षण अवघड, समाजाला दुखवू नका : शरद पवार

ब्राह्मण समाजाला आरक्षण अवघड, समाजाला दुखवू नका : शरद पवार

googlenewsNext

पुणे : आमच्या पक्षातील काही नेत्यांच्या वक्तव्याबाबत ब्राह्मण समाजाचे आक्षेप होते. ब्राह्मण समाजाला दुखवू नका, अशी समज पक्षाच्या नेत्यांना दिली असल्याचे त्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची बैठक व अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यांच्या मागणीवरूनच ही बैठक घेतली असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्यासमवेत राज्यातील ब्राह्मण समाजाच्या काही संघटनांच्या प्रतिनिधींची शनिवारी दुपारी बैठक झाली. पंडित वसंतराव गाडगीळ, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी तसेच राज्यातील १० संघटनांचे सुमारे ४० प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यावेळी उपस्थित होते.

दीड तासाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, आमच्या पक्षातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. ब्राह्मण समाजाने बैठकीची मागणी केली. संबंधित नेत्यांची वक्तव्ये चुकीची होती. जातीय धार्मिक विद्वेष निर्माण होईल असे कोणी बोलू नये, अशी समज नेत्यांना दिली आहे. समाजात शांतता असायला हवी. कोणताही समाज अस्वस्थ, अशांत होतो त्यांच्याकडून काही मागणी आली तर पूर्ण करणे कामच आहे. बैठकीत खेळीमेळीत चर्चा झाली. त्यांच्या शंकांचे निराकरण झाले, असे पवार यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातील ब्राह्मण समाज शहरी भागात येत असल्याचे संघटनांनी सांगितले. त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळासारखी योजना त्यांना हवी आहे. हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो. या तसेच अन्य काही विषयांवर मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले, असे पवार यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजाला आरक्षण अवघड
ब्राह्मण संघटनांनी आरक्षणाची मागणी केली. ते होईल असे वाटत नसल्याचे त्यांना स्पष्ट सांगितले. माझ्याकडे काही आकडेवारी आहे. त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांमध्ये समाजाचे प्रमाण जास्तच असल्याची माहिती त्यांना दिली, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Reservation difficult for Brahmin community dont hurt Brahmin community said ncp supremo Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.