आरक्षण प्रत्यक्षात येणे अवघड; पण श्रेयासाठी सुरू चढाओढ
By admin | Published: January 9, 2017 03:42 AM2017-01-09T03:42:03+5:302017-01-09T03:42:03+5:30
पुणे शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी नुकताच मंजूर केला़ त्यातील बदललेली काही आरक्षणे पुन्हा तशीच ठेवण्यात आली़ हा
पुणे : पुणे शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी नुकताच मंजूर केला़ त्यातील बदललेली काही आरक्षणे पुन्हा तशीच ठेवण्यात आली़ हा बदल आपल्यामुळेच झाला, असे सांगत सध्या शहरातील अनेक भागांत श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे़ त्यातील काही आरक्षणे तर खरोखरच प्रत्यक्षात येणार की नाही, अशी स्थिती असताना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयाची ही चढाओढ जोरात सुरू आहे़ शहरातील अशा अनेक आरक्षणांपैकी गोखलेनगरमधील मॅफको कंपनीच्या आरक्षणावरूनही सध्या ही चढाओढ जोर धरू लागली आहे़
मॅफको कंपनीच्या जागेवर महापालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण विकास आराखड्यात टाकले होते़ शासनाच्या चोक्कलिंगम समितीने त्या जागेवर शैक्षणिक संकुलाचे आरक्षण टाकले होते़ शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात पुन्हा या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे़ त्यावरून आता या जागेवर क्रीडा संकुल, नाट्यगृह आणि पोलीस चौकी उभारण्याच्या सर्वांच्या साक्षीने पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ प्रभागातील नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींचा मोठा परिणाम म्हणजे चोक्कलिंगम समितीने उठविलेले मैदानाचे आरक्षण शासनाला पूर्ववत करावे लागले, असा व्हॉट्स अॅप नगरसेवकाने सर्व ग्रुपवर टाकला़ त्यापाठोपाठ माजी नगरसेवकाने दुसरा व्हॉट्स अॅप विविध ग्रुपवर टाकला़ त्यात त्यांनी म्हटले, की २००७ पासून विकास आराखडा तयार करण्याचे काम पुणे महापालिकेत चालू होते़ त्यात गोखलेनगर भागातील मॅफको कंपनीच्या जागेवर मुलांसाठी क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्याची मागणी केली होती़ त्यानुसार आरक्षणाची मागणी मान्य करून मार्च २०१२ च्या निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०११ मध्ये हे आरक्षण जाहीर झाले आहे़
सध्या ही जागा वनविभागाने आपल्या ताब्यात घेतली असून, तिथे त्यांनी वृक्षारोपणास सुरुवातही केली आहे़ या जागी त्यांना लॅबोरेटरी उभारायची आहे़ याशिवाय गार्डन उभारण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे़ राज्यातील वनाखालील क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे़ वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी एखाद्या प्रकल्पासाठी घ्यायची असेल तर त्याला थेट केंद्र शासनाची परवानगी आता घ्यावी लागणार आहे़ हे अतिशय किचकट आणि वेळखाऊ काम आहे़ त्यामुळे महापालिकेने जरी आरक्षण टाकले तरी ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता सध्या तरी खूपच अंधुक असताना येणारी निवडणूक पाहून श्रेयाची लढाई सुरू झाली आहे़