विमानतळासाठी पुन्हा सर्व्हे
By admin | Published: November 9, 2016 02:31 AM2016-11-09T02:31:54+5:302016-11-09T02:31:54+5:30
स्थानिक लोकांच्या विरोधानंतर पुन्हा एकदा शासनाकडून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या १० नोव्हेंबर पासून सर्व्हे करण्यात येणार आहे
पुणे : स्थानिक लोकांच्या विरोधानंतर पुन्हा एकदा शासनाकडून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या १० नोव्हेंबर पासून सर्व्हे करण्यात येणार आहे. लोकांचा विरोध लक्षात घेता पोलीस संरक्षणामध्ये पहिल्या टप्प्यात सरकारी जागेचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमातळासाठी २० आॅक्टोबरपासून सूक्ष्म सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात आली होती. पंरतु सर्व्हेसाठी गेलेल्या समितीला विरोध करून स्थानिक लोकांनी हकलवून दिले होते. परंतु आता पुन्हा हैद्राबाद येथील समिती हा सर्व्हे करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असून, १० नोव्हेंबरपासून सर्व्हेचे काम सुरु करणार आहे. यात याबाबत राव यांनी सांगितले की, पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील राजेवाडी-वाघापूर येथील सुमारे दोन हजार हेक्टर जमिन संपादीत करण्यात येणार आहे. येथील नागरिकांनी विमानतळासाठी जागे देण्यास जोरदार विरोध केला आहे. हा विरोध करण्यासाठी नागरिकांशी चर्चा सुरू असून, पहिल्या टप्प्यात राजेवाडी, पारगाव मेमण आणि मुंजवडी येथील ४०० हेक्टर सरकारी जागेचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या शेतक-यांनी मान्यता दिलेल्या ६०० हेक्टर जमिनीचा सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्वांत शेवटी विरोध असणा-या लोकांच्या जागेचा सर्व्हे करणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
मोबदला देण्यासाठी अमरावती मॉडेल
लोकांचा विरोध कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने थेट संवाद साधण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या संमितीशिवाय कोणत्याही स्वरुपांचा जमिन संपादीत करण्यात येणार नाही. दरम्यान विमानतळाचा सूक्ष्म सर्वे झाल्यानंतर कोणत्या जमिनी संपादीत करण्यात येणार आहे, यासाठी शासनाच्या वतीने स्वतंत्र नोटीफिकेश्न प्रसिध्द करण्यात येणार आहे.
त्यामुळे नोटीफिकेश्न प्रसिध्द करण्यापूर्वी येथील शेतक-यांना अमरावाती (अंध्र प्रदेश), नवी मुंबई आणि कोंची तीन मॉडेलाचा अभ्यास करून पुरंदर साठी स्वंतत्र मॉडेल तयार करण्यात येणार आहे. यात आमरावती मॉडेलच्या धरर्तीवर एक अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून, यात नवीन भूसंपादन कायाद्यानुसार मोबादला देणे,
१५ किंवा २० टक्के विकसित जमिन देणे आणि विमानतळाचा पूर्ण विकास होई पर्यंत संभाव्य उत्पादन गृहीत धरून नुकसान भरपाई देखील देण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन
या वेळी बोलताना संजय असवले यांनी, पहिल्या टप्प्यात मेमाणे-पारगाव, मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर या चार गावांतील शासकीय जमिनींची मोजणी करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करण्यात येणार आहे.
चांगला मोबदला
देण्याचा प्रयत्न
विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने देशातील इतर ठिकाणच्या विमानतळ व त्याबाबत दिलेला मोबदला आणि पुनर्वसनाचा अभ्यास केला आहे. पुरंदर विमानतळासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यापेक्षाही चांगला मोबदला देण्याचा विचार असून, तो एकरकमी मिळेल, असे असवले यांनी सांगितले.
उद्या मरायचे, तर आजच मरू : विमानतळामुळे पुरंदर तालुक्यातील सात गावातील शेतकऱ्यांची झोप उडाली असून १० तारखेला पहिल्या टप्प्यात पारगाव खानवडी मुंजवडी एखतपुर येथे पोलिस बंदोबस्तात मोजणी होणार आहे. ही मोजणी विमानतळासाठीच होत असल्याने सरकारी मोजणी असली तरी उद्या खाजगी जमिनीही सरकार बळकावणार असल्याने मोजणीला विरोध करणारच यावर पारगावातील शेतकरी एकवटले असून २५ महिला पुरुषानी बैठकीत अस्तित्वासाठी मरायची तयारी दर्शवली आहे. शेतकरी आक्रमक झाले असून विमानतळाची मोजणी होऊ देणार नाही असे सरपंच सर्जेराव मेमाणे यांनी सांगितले
ग्रामस्थ काय करणार?
गेल्यावेळी सर्वेक्षणासाठी आलेल्या लोकांना ग्रामस्थांना अडवून पिटाळून लावले होते. ऐन दिवाळीतही विमानतळ विरोध प्रकट करण्यासाठी विमानतळ निषेधाच्या रांगोळ््या आणि विमानतळ विरोधासाठी काळ््या गुढ्या उभारल्या होत्या. मूक मोर्चातूनही नागरिकांचा हा तीव्र विरोधच दिसून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आता नक्की काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
नाळ जुळलीये, त्याचे काय?
एकवेळ जमिनीचा मोबदला शासन चांगला देईलही परंतु जमिनीशी जी नाळ जुळली आहे ती कशी तोडणार? ज्यांचं अवघं आयुष्य गावात गेलं ती माणसं गाव सोडून जाण्याची साधी कल्पनाही करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.