पुणे पोलीस आयुक्तालयात फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:43 AM2018-08-17T00:43:52+5:302018-08-17T00:44:14+5:30

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलीस आयुक्तालयात काही फेरबदल करण्यात आले आहेत. आता पुणे पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे असणार आहेत.

Reshuffle of Pune Police Commissionerate | पुणे पोलीस आयुक्तालयात फेरबदल

पुणे पोलीस आयुक्तालयात फेरबदल

Next

पुणे  - स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलीस आयुक्तालयात काही फेरबदल करण्यात आले आहेत. आता पुणे पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे असणार आहेत. प्रत्येक परिमंडळात सहा पोलीस ठाणी असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ही पुनर्रचना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली.
१५ आॅगस्टपासून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात ३० पोलीस ठाणी येतात. तीन परिमंडळांमध्ये या पोलीस ठाण्यांचे काम सुरू होते. मात्र, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर ग्रामीणमधील काही पोलीस ठाणी शहरात येऊ घातली आहेत, तर काही नवीन पोलीस ठाण्यांची निर्मितीही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची सोय व्हावी व गुन्ह्यांना आवर घालता यावा यासाठी पोलीस आयुक्तालयात पाच परिमंडळे निर्माण करण्यात आली आहेत. या परिमंडळांमध्ये प्रत्येकी सहा पोलीस ठाणी असतील. दरम्यान, गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुणे शहर आयुक्तालयात बैठक झाली़ त्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात मनुष्यबळ, कार्यालय आदीबाबत चर्चा केली. परकीय नागरिक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्याकडे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट ५ किंवा वाहतूक विभाग, मगरपट्टा या इमारतीमध्ये परिमंडळ पाच उपायुक्त यांचे कार्यालय सुरू होईल. तर परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांचे कार्यालय नवीन जागा मिळेपर्यंत फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीत असेल.

१ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारीवर्ग
पुणे पोलीस आयुक्तालयातील १ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. पिंपरीतील आधी कार्यरत असलेले १ उपायुक्त, १ सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक, ६७ उपनिरीक्षक, ११५ सहायक फौजदार, ३६१ हवालदार, ४२५ पोलीस नाईक आणि ६१६ पोलीस शिपाई वर्ग करण्यात आले असून, अद्याप दोनशे पोलीस कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्या बदल्यात गार्ड, एस्कॉर्ट, कैदी पार्टी, खासदार, आमदार संरक्षण, आरसीपी, व्हीआयपी दौरे आदींसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे, असे प्रशासन पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

अशी असेल परिमंडळनिहाय रचना
परिमंडळ १: समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, डेक्कन आणि शिवाजीनगर
परिमंडळ २: सहकारनगर, स्वारगेट, भारती विद्यापीठ, बंडगार्डन, लष्कर, कोरेगाव पार्क
परिमंडळ ३ : कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगड रोड, अलंकार
परिमंडळ ४ : खडकी, विश्रांतवाडी, चतु:शृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ आणि लोणी कंद (प्रस्तावित)
परिमंडळ ५ : हडपसर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर (प्रस्तावित)

Web Title: Reshuffle of Pune Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.