वडारवाडीतील रहिवासी पुनर्वसन प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:36+5:302021-05-19T04:11:36+5:30
पुणे : वडारवाडीतील प्लॉट नंबर ३३४ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात माहिती ...
पुणे : वडारवाडीतील प्लॉट नंबर ३३४ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात माहिती न दिल्याने लाभार्थी संभ्रमात आहेत, तर प्रकल्पाबाबत काही स्थानिक लोक विनाकारण आडकाठी आणत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात १८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे निर्देश असताना चार वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कॉलम उभारण्याच्या पुढे काम सरकले नाही. या सर्व गोष्टींकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
वडारवाडी येथे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांनी २०१७ साली जागा ताब्यात घेऊन बांधकामास सुरुवात केली. कॉलम उभारणीनंतर येथील काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे तब्बल १२६ कुटुंबांचे हाल होत आहेत. मूळ जागा मालकांना येथे घर मिळणार आहे. सध्या ते परिसरातच भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यासाठी विकसकातर्फे या १२६ कुटुंबांना दरमहा ३ हजार रुपये भाड्यापोटी मिळतात. मात्र ते अपुरे आहे. कारण परिसरात ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत भाडे असल्याने आर्थिकदृष्ट्या ते परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकतर घरभाडे वाढवून मिळावे किंवा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
-------------------
विकसकाने माझ्या पालकांचे घरभाडे दोन वर्षांपासून थकवले आहे. याबाबतीत प्राधिकरणामध्ये तक्रार केली. मात्र अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रकल्पाला परवानगी देऊन मोठी चूक केलीय का, असे वाटायला लागले आहे.
- रवी कांबळे, प्रकल्प लाभार्थी
---
विकसक वेगवेगळी कारणे सांगून आमची दिशाभूल करत आहे, असे आम्हाला वाटू लागले आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.
- अजहर शेख, प्रकल्प लाभार्थी
---
आम्हास विकासकाकडून जे घरभाडे तीन वर्षांपासून मिळते ते पुरेसे नाही. आम्हाला बाहेर दरमहा सहा ते आठ हजार रुपये भाडे भरावे लागते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत घरभाडे वाढवून मिळावे.
- आकाश मयूर, प्रकल्प लाभार्थी
-----
प्रत्येक कुटुंबाला आम्ही दरमहा तीन हजार रुपये भाड्यापोटी देत आहोत. एक झाड आणि महापालिकेचे स्वच्छतागृह काढण्यासाठी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने यात वर्षभराचा कालावधी गेला. त्यानंतर कोरोना संकटामुळे काम सध्या थांबले आहे.
- नीलेश खेडेकर, प्रकल्प विकसक, बांधकाम व्यावसायिक
----
राज्य शासनाच्या नवीन नियमावलीमुळे या प्रकल्पासाठी नव्याने काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यातच कोरोना संकटामुळे कामगार गावी गेल्याने दीड वर्षापासून प्रकल्प थांबला आहे. लॉकडाऊन उठल्यावर विकासकाला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देणार आहे.
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
---
फोटो ओळ : वडारवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचे उभारलेले कॉलम.