भोर शहरवासीयांचे सुरू आहेत पाण्यावाचून हाल!
By admin | Published: May 4, 2017 01:59 AM2017-05-04T01:59:39+5:302017-05-04T01:59:39+5:30
वारंवार फुटणारी सिमेंटची पाइपलाइन, कमीदाबाने पाणीपुरवठा, खंडित होणारा वीजपुरवठा आणि नियोजनाचा अभाव यामुळे
भोर : वारंवार फुटणारी सिमेंटची पाइपलाइन, कमीदाबाने पाणीपुरवठा, खंडित होणारा वीजपुरवठा आणि नियोजनाचा अभाव यामुळे उन्हाळ्यात भोर शहरात पाण्यावाचून नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. नगरपालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले असून पालिकेच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन व जुनी अशा नळपाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मात्र, जुनी नळपाणी पुरवठा योजना साधारणपणे २५ वर्षांपूर्वीची आहे. सिमेंटचे पाइप वापरण्यात आले असून पाइप खराब झाले आहेत.
शिवाय, सदरची पाइपलाइन शहरातून एसटी स्टँड, बजरंग आळी, नवीआळीतून पोलीस स्टेशनजवळून शंकर हिल येथील टाकीत सोडली आहे. शहरात सतत वाहनांची वाहतूक असून पाइपलाइनवरून जड वाहन गेल्यास पाइपलाइन वारंवार फुटते. यामुळे पाणीपुरवठा बंद राहातो. शहरात कमीदाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोटर शिवाय पाणीच चढत नाही. अनेकदा सकाळी सकाळीच पाणी येण्याच्या वेळीच वीजपुरवठा
खंडित होतो.
शहरातून जाणारी सिमेंटची पाइपलाइन शिवाजी विद्यालयाजवळ फुटल्याने मंगळवारी शहरात पाणी बंद होते. बुधवारी सकाळी नागरिक पाण्याची वाट बघत असतानाच सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. दिवसाआड आलेले पाणी आल्यावर नागरिकांना थोडेसे पाणी मिळाले, तर शहरात ठरावीक ठिकाणीच हातपंप वगळता नगरपालिकेच्या पाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे एैन उन्हाळयात पाण्यावाचून नागरिकांचे हाल सुरु आहेत.
शहरातून जाणारी सिमेंची फुटलेली पाइपलाइन जोडण्याचे काम सुरु असून उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांनी सांगितले.(वार्ताहर)