पुणे मेट्राेनं गल्लीबाेळात स्टेशन आणलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:00 PM2018-12-27T14:00:35+5:302018-12-27T14:02:49+5:30
कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मेट्राे स्टेशन हटावं मुळ पुणे बचाव अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या.
पुणे : पुण्यातील मेट्राे काम वेगात सुरु आहे. नरेंद्र माेदींनी तर काही दिवसांपूर्वी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्राे मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात 2019 मध्ये पुण्यात मेट्राे धावू लागेल अशी घाेषणा देखील केली. परंतु कसबा पेठेत मेट्राेचे स्टेशन उभारण्यासाठी आता कसबा पेठेतील रहिवाशांनी विराेध केला आहे. कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. यावेळी माेठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित हाेते. काळे झेंडे दाखवत कसबा आमच्या शिवबाचं नाही काेणाच्या बापाचं अशा घाेषणा देण्यात आल्या. तसेच कसबा पेठेत मेट्राेचे स्ठेटन करु नये अशी मागणी करण्यात आली.
मेट्राेच्या पहिल्या आराखड्यात मेट्राेचे स्टेशन हे बुधवार पेठेत हाेते. आत हे स्टेशन कसबा पेठेत करण्याचे नियाेनजन करण्यात आले आहे. कसबा पेठेला माेठा ऐतिहासिक वारसा आहे. अनेक प्राचीन मंदिर आणि मस्जिद या मेट्राे स्टेशनमुळे बाधीत हाेणार आहेत. मेट्राे कंपनी ही प्राचिन मंदिरं आणि येथील नागरिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आराेपही यावेळी करण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत येथे मेट्राे स्टेशन हाेऊ देणार नाही असा निर्धार येथील नागरिकांनी केला आहे. मुळ पुणे म्हणजे कसबा पेठ खुद्ध झांबरे पाटलांनी राजमाता जिजाऊ यांना लाल महाल बांधण्यास जागा दिली. हा इतिहास माहित नसणाऱ्यांनी कसबा पेठ येथे स्टेशन प्रस्तावित केले. असे लिहीलेले फ्लेक्सही ठिकठिकाणी लावण्यात आले हाेते. तसेच चाैकात माेठा फ्लेक्स लावून मेट्राे स्टेशन हटाव मुळ पुणे बचाव असे त्यावर लिहीण्यात आले हाेते.
याबाबत येथील रहिवासी असलेले प्रमाेद कवडे म्हणाले, या भागातील आधीचे स्टेशन हे बुधवार पेठेत प्रस्तावित हाेते. नंतर ते कसबा पेठेत करण्यात आले. कसबा पेठेपासून शिवाजीनगर आणि मंडई ही दाेन्ही मेट्राे स्थानके जवळ आहेत. तसेच येथे हाेणाऱ्या मेट्राे स्टेशनमुळे येथील ऐतिहासिक वारशाला धक्का बसणार आहे. त्याचबराेबर येथील शेकडाे लाेक बाधीत हाेणार आहेत. या मेट्राे स्थानकामुळे येथील झांबरे चावडी देखील बाधीत हाेणार आहे. या चावडीत शिवकाळापूर्वीपासून न्यायनिवाडा हाेत असे तसेच झांबरे पाटील यांनी स्वतः जिजाऊंना लाल महाल बांधण्यास जागा दिली हाेती. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या इतका महत्त्वाचा हा भाग असताना येथे मेट्राे स्टेशन करण्याचा घाट घातला जात आहे. कसबा पेठेला वारसा आहे. इथलं वेगळेपण येथील लाेकांनी अजूनही जपलं आहे. इथली संस्कृतीला या मेट्राे स्टेशनमुळे धक्का लागणार आहे. पुणे मेट्राे कंपनी गल्ली बाेळात मेट्राे स्टेशन करत आहे. त्यामुळे येथे हाेणाऱ्या मेट्राे स्थानकाला आमचा तीव्र विराेध आहे.
अमजद शेख म्हणाले, या मेट्राे स्टेशनमुळे अनेक ऐतिहासिक मंदिरांबराेबरच येथे असलेली चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची मस्जिद पाडण्यात येणार आहे. त्याचबराेबर इथल्या शेकडाे लाेकांना आपलं घर साेडावं लागणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट म्हणतात कसबा स्टेशनला काही मूठभर लाेकांचा विराेध आहे. पालकमंत्री लाेकांची दिशाभूल करत आहेत. कसबा पेठेची संस्कृती जपायलाच हवी. त्यामुळे येथील प्रस्तावित मेट्राे स्टेशन रद्द करण्यात यावे.