पाणीटंचाईने ग्रामस्थांची उडवली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 12:41 AM2016-06-02T00:41:41+5:302016-06-02T00:41:41+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दहा हजारांनी पाळीव जनावरांची संख्या घटली आहे. शेतीला तहानेने त्रस्त करणाऱ्या पन्नास वर्षांतल्या या अभूतपूर्व दुष्काळाने नदीपात्रातील हजारो जलचर मारून टाकले आहेत
इंदापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दहा हजारांनी पाळीव जनावरांची संख्या घटली आहे. शेतीला तहानेने त्रस्त करणाऱ्या पन्नास वर्षांतल्या या अभूतपूर्व दुष्काळाने नदीपात्रातील हजारो जलचर मारून टाकले आहेत. या दुष्काळाने इंदापूरकरांची झोप उडविली आहे. त्यातच शासनाच्या पाच तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाने तर पाणी टँकर भरण्याचीदेखील अडचण केल्याचे चित्र आहे.
गेल्या बारा वर्षांत अगदी कमी वेळा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. एरवी सलग तीन-तीन वर्षे तालुका दुष्काळाशी सामना करीत आहे. यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या आधीपासूनच पाण्याचे टँकर लावावे लागले. उन्हाळा संपत आला तरी अद्याप १५ टँकरने १७ गावे ४० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील ३१ हजार ५९५ वाड्यांवरील १७ हजार ९७१ असे एकूण ४८ हजार ९७१ लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी ३१ गावे आहेत. लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, अकोले, वायसेवाडी, निंबोडी, लाकडी, काझड, शिंदेवाडी, कळस, बिरंगुडवाडी, पिलेवाडी, गोसावीवाडी, निमगाव केतकी, कचरवाडी, व्याहळी, कौठळी, कडबनवाडी, तरंगवाडी, गोखळी, रुई, थोरातवाडी, मराडेवाडी, झगडेवाडी, लोणी देवकर, बळपुडी, न्हावी, कचरवाडी (बावडा), पिठेवाडी, निरनिमगाव, चाकाटी, पंधारवाडी, बेडशिंगे, गलांडवाडी नं. २ अशी या गावांची नावे आहेत. या गावात ८१ हजार ९३४ पाळीव जनावरे आहेत. त्यामध्ये २५ हजार ८७० गायी, म्हशी, तर ४६ हजार ३९१ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे.
यंदाच्या दुष्काळामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जनावरांच्या संख्येत सुमारे दहा हजारांनी घट आली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. लहू वडापुरे यांनी दिली आहे. या गावांमधील चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोजची चाऱ्याची गरज १ हजार ९३० टनएवढी आहे. उपलब्ध असणारा १ लाख १९ हजार ७८८ टन चारा ३१ मे रोजी संपुष्टात आला आहे. म्हसोबाचीवाडी, लाकडी, निमगाव केतकी, बिजवडी, शहाजीनगर या ठिकाणी चारा छावण्या सुरू करणे आवश्यक आहे.
पुरंदर तालुक्यातील २९ हजार लोकसंख्येला टँकरने पाणी
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील तीन गावठाणे आणि ११३ वाड्यावस्त्यांवरील सुमारे २८,८३३ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
पुरंदर तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झालेली असून, तालुक्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांना १९ टँकरद्वारे सुमारे ५६ खेपांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात पिंपरी, राख आणि एखतपूर या गावठाणांसह वाड्यावस्त्या त्याचबरोबर वाल्हे, पांडेश्वर, मावडी क.प., नायगाव, माळशिरस, राजुरी, रिसे, टेकवडी, मावडी सुपे, भोसलेवाडी, साकुर्डे, बेलसार, खानवडी, दिवे, जेजुरी ग्रामीण, सोनोरी, नावळी, कोळविहिरे, कर्नलवाडी आदी गावांच्या वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे.
याशिवाय झेंडेवाडी, जवळार्जुन, खानवडी, बहिरवाडी, वाल्हेच्या इतर वाड्या आदी ठिकाणीही टँकरच्या मागणीचे प्रस्ताव दाखल झालेले आहेत. (वार्ताहर)
भोर : भोर तालुक्यात पाणलोट क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ३ गावे व १६ वाड्यावस्त्यांना ४ टँॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपाणामुळे काही ठिकाणी तीन ते चार दिवसाआड पाणी मिळत आहे. भाटघर व नीरा देवघर धरण भागातील व महुडे व वीसगाव खोऱ्यातील गावामध्ये पाणीटंचाई सुरू आहे. १४ गावे २८ वाड्यावस्त्यांनी टॅँकर मागणीचे प्रस्ताव ३० एप्रिल रोजीच भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. तर, काही प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच दिले आहेत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी प्रस्ताव सादर केल्यावर प्रत्येक गाव, वाड्यावस्त्यांवर जाऊन पाण्याची परिस्थिती पाहून अहवाल सादर केला आहे. मात्र, त्यानंतर ३ गावांचे व १० वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.