‘रेसिड्यू’मुक्त डाळिंबांना युरोपात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:37 PM2019-01-08T23:37:03+5:302019-01-08T23:37:14+5:30
इंदापूर तालुक्यातून निर्यात : जागेवर किलोला १२० रुपये एवढा चांगला भाव
लाखेवाडी : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे ‘रेसिड्यू’मुक्त (विषमुक्त) डाळिंब युरोप देशात चालले आहे. निर्यातक्षम डाळिंबाला या शेतकºयाला जागेवर प्रतिकिलो १२० रुपये एवढा चांगला भाव मिळत आहे. बावडा(ता. इंदापूर) च्या मनोज मोरे या डाळिंब उत्पादक शेतकºयाची यंदा ७ टन डाळिंबे रेसिड्यूमुक्त असल्याने त्यांना युरोपात माठी मागणी होत आहे.
मोरे यांचे डाळिंब फळ हे ‘रेसिड्यू’ मुक्त असल्याचा तपासणी अहवाल आल्याने युरोपात त्यांच्या फळांची निर्यात केली जात आहे. त्यांची दीड एकर डाळिंब फळबाग असून हे पहिलेच पीक आहे. पहिल्याच हंगामात ७ टन निर्यातक्षम डाळिंब निघेल, असे मोरे यांनी सांगितले. बागेतून दुय्यम दर्जाचे ४ टन डाळिंब निघण्याची शक्यता आहे. दुय्यम दर्जाचे डाळिंब जागेवर प्रतिकिलो ३४ रुपये दराने स्थानिक व्यापाºयास विकण्यास सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी पाणी व औषधांचे योग्य व्यवस्थापन हे काटेकोरपणे केले. फळांचे ‘आॅक्टोबर हीट’पासून संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्शन पेपरचा योग्य वापर केला. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी वडील पांडुरंग मोरे, आई पुष्पलता मोरे, चुलते दिलीप मोरे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.
डाळिंबाच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये घसरण झाल्याने शेतकºयांना सध्या सरासरी ३० ते ३५ रुपये एवढा कमी दर मिळत आहे. परिणामी, डाळिंबपिकाला उत्पादनखर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेण्याची गरज आहे.
- शहाजी शिंगाडे, डाळिंब उत्पादक शेतकरी